निधन वार्ता : माजी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप राणा शिंदे यांचे निधन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील प्रख्यात माजी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रदीप राणा शिंदे (वय ६२, रा. भद्रावती, हल्ली मुक्काम नागपूर) यांचे दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चंद्रदीप शिंदे यांनी जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून कार्यरत असताना क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ मिळावे, नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन, खेळाडूंना मार्गदर्शन व क्रीडा संस्कृती रुजविण्यात त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. त्यांच्या कार्यकाळात अनेक खेळाडूंनी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवर यश संपादन केले.
त्यांच्या निधनाने क्रीडा क्षेत्रातील एक अनुभवी, मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त होत असून क्रीडा प्रेमींमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.
चंद्रदीप शिंदे यांच्या जाण्याने जिल्ह्यातील क्रीडा चळवळीला मोठा धक्का बसला असून विविध स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.



