माजरी (वस्ती) येथे राष्ट्रसंत पुण्यतिथी निमित्ताने जनप्रबोधनपर कार्यक्रम तथा ज्येष्ठ मंडळींचा सत्कार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
श्री गुरुदेव सेवा मंडळ माजरी (वस्ती) ता. भद्रावती च्या वतीने सामुदायिक प्रार्थना मंदिर प्रांगणात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात आले. घटस्थापना, पालखी व रामधून, भजन, सामुदायिक ध्यान व प्रार्थना आदी उपक्रम राबविण्यात आले. आदल्या दिवशी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने चमत्कार, विज्ञान व जादूटोणा विरोधी कायदा संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
राज्य सहकार्यवाहक पी. एम. जाधव, दुरेंद्र गेडाम, देवराव कोंडेकर आदींनी या कार्यक्रमात प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना वैज्ञानिक दृष्टिकोन समजावून दिला. काल्याचे कीर्तन आदिलाबाद बेला येथील सुरेश उदार महाराज यांनी करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. समारोपीय कार्यक्रम ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी माजरी च्या सरपंच सौ. छाया जंगम, ज्येष्ठ समाजसेवक शामसुंदर पोडे, एड. रमेश रोटे, मंडळाचे अध्यक्ष संजिव पोडे, उत्तमराव झाडे, विनोद पिंपळकर, श्रीमती संध्या पोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी उत्तमराव झाडे यांच्या सहकार्याने गावातील सात ज्येष्ठ नागरिकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तसेच गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य असलेले कुणाल टोंगे हे महावितरण कंपनीत निवड झाल्याबद्दल त्यांचाही गौरव मंडळाचे वतीने करण्यात आला. पन्नास वर्षांपूर्वी दिवंगत चिमनाबाबू झाडे यांनी माजरी गावात राष्ट्रसंतांच्या विचारानुसार कार्य सुरू केले होते ते काम अलिकडे येथील युवा मंडळी पुढे नेत आहे, हे कौतुकास्पद असल्याचे मत बंडोपंत बोढेकर यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक संजिव पोडे यांनी केले. सूत्रसंचालन देवराव पाटेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश रोटे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन झाडे, अमोल ठमके, अमन खडतकर, प्रफुल तिखट, अमोल पारखी, रमेश देठे ,सचिन पाचभाई, नयन डोंगे, कुणाल टोंगे, अविनाश जीवतोडे आदी युवकांनी तसेच महिला मंडळाच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.



