ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लोक शिक्षण संस्थेच्या माजी विद्यार्थ्याचा स्नेह मेळावा उत्साहात

अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य; आठवणींना उजाळा, गौरवाचा क्षण

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

राजेंद्र मर्दाने, वरोरा

    लोक शिक्षण संस्था, वरोडा संचालित लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय आणि माजी विद्यार्थी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून संस्थेच्या प्रांगणात माजी विद्यार्थ्यांचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात पार पडला. सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत दोन सत्रांत आयोजित या मेळाव्यात देश-विदेशातून आलेल्या सुमारे एक हजार माजी विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली.

मेळाव्याचे उद्घाटन लोकमान्य विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक आनंद शिरभय्ये यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष प्रा. श्रीकांत पाटील होते. यावेळी व्यासपीठावर प्रसिद्ध उद्योजक व माजी विद्यार्थी वसंत महाजन, (मुंबई), प्राचार्य राहुल राखे, माजी विद्यार्थी संस्थेचे संयोजक प्रा. अनिल नानोटकर आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व अमृत महोत्सवी गीताने झाली.

कार्यक्रमात लोकमान्य कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले समूह नृत्य व लोकमान्य महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या समूहगीताने उपस्थितांची मने जिंकली. संस्थेच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारी माहितीपट चित्रफीत यावेळी दाखविण्यात आली. आनंद शिरभय्ये व वसंत महाजन यांनी संस्थेच्या घडणीत शिक्षक-विद्यार्थी नात्याचे महत्त्व अधोरेखित करत मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले.

उद्घाटन सत्रात संस्थेचे माजी प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक-कर्मचारी, विविध क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त माजी विद्यार्थी तसेच राज्य व राष्ट्रीय स्तरावरील प्राविण्य प्राप्त खेळाडूंचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. सत्राचे प्रस्ताविक प्रा. अनिल नानोटकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रशांत खुळे, उमेश लाभे व स्मिता बोंडे यांनी संयुक्तपणे केले. वंदे मातरम्‌ने सकाळच्या सत्राची सांगता झाली.

दुपारच्या सत्रात माजी विद्यार्थ्यांनी गायन, वादन, नृत्य, अभिनय, एकपात्री प्रयोग तसेच तत्कालीन शालेय अभ्यासक्रमातील कवितांचे प्रभावी सादरीकरण केले. या सत्राचे संचालन डॉ. प्रशांत खुळे यांनी केले तर आभार प्राचार्य राहुल राखे यांनी मानले.

संस्थेच्या परिसरात दिवंगत शिक्षक-कर्मचाऱ्यांना अभिवादन करणारे श्रद्धांजली बॅनर तसेच गुणवंत विद्यार्थी व यशस्वी खेळाडूंचे फोटो असलेले फलक लक्षवेधक ठरले. १९९७ बॅचच्या विद्यार्थ्यांची बँड पथकासह फेटे परिधान करून केलेली आगमन रॅली व २००३ बॅचचे आकर्षक टी-शर्ट विशेष आकर्षण ठरले. यावर्षी आयोजित झालेला हा चौथा मेळावा असून अनेक वर्षांनंतर पुन्हा भेटल्याचा आनंद माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत होता. खेळीमेळीच्या वातावरणात व भावनिक आठवणींनी नटलेला हा मेळावा उत्साहात संपन्न झाला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये