केंद्रीय सेवा निवृत्त कर्मचारी संघाचा स्नेह मिलन सोहळा 18 जानेवारी रोजी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
केंद्रीय सेवा निवृत्त कर्मचारी संघाच्या वतीने स्नेह मिलन सोहळ्याचे आयोजन रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी शिंदे मंगल कार्यालय, भद्रावती येथे करण्यात आले आहे.
विविध औद्योगिक व शासकीय सेवांमध्ये कार्यरत असताना अनेक कर्मचाऱ्यांनी आपल्या आयुष्यातील 35 ते 40 वर्षे एका कुटुंबाप्रमाणे एकत्र काम केले. सेवा काळात एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होत घनिष्ठ संबंध निर्माण झाले. मात्र सेवा निवृत्तीनंतर हा औद्योगिक परिवार विखुरला गेला असून अनेक सहकाऱ्यांचा संपर्क तुटला आहे. हीच बाब लक्षात घेऊन हा स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
संघटनेचे ज्येष्ठ मार्गदर्शक मा. मनोहरराव साळवे यांच्या पुढाकारातून सन 2024 पासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली असून, निवृत्त सहकाऱ्यांना पुन्हा एकत्र आणण्याचा हा प्रयत्न आहे.
या सोहळ्यात 75 वर्षे वय पूर्ण केलेल्या ज्येष्ठ सदस्यांचा तसेच सेवेत 50 वर्षे पूर्ण केलेल्या सदस्यांचा यथोचित सत्कार करण्यात येणार आहे. याशिवाय आगामी काळात 75 वर्षे पूर्ण करणाऱ्या सदस्यांचाही सन्मान करण्याचा संघटनेचा मानस आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध ज्येष्ठ व मान्यवर व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच जुन्या आठवणींना उजाळा देणारे अनुभव कथन होणार आहे. या माध्यमातून सदस्यांमध्ये आपुलकी, स्नेह व चैतन्य निर्माण व्हावे आणि उर्वरित आयुष्य आनंदात व्यतीत व्हावे, हा या स्नेह मिलन सोहळ्यामागील उद्देश असल्याचे संघटनेतर्फे सांगण्यात आले.
तरी सर्व केंद्रीय सेवा निवृत्त कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांनी या स्नेह मिलन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.



