ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हाधिका-यांनी घेतला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा सर्वंकष आढावा

एचआयव्हीसह जगणाऱ्या व अतिजोखीम गटातील समुहाला शासकीय योजनांचा लाभ देण्याचे निर्देश

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचा त्रैमासिक आढावा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. राष्ट्रीय एड्स कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेत. या आरोग्य योजना रुग्णांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिल्या.

बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नयना उत्तरवार, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, एआरटी वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, डॉ. श्रीकांत जोशी आदी उपस्थित होते.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करतांना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.महादेव चिंचोळे यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. एप्रिल ते नोव्हेंबर 2025 मध्ये जिल्हयात मोठ्या प्रमाणात सामान्य नागरिकांच्या एचआयव्ही व सिफिलिस चाचण्या झाल्या. त्यामध्ये संक्रमित आढळलेल्या संपूर्ण जणांना उपचारावर घेण्यात आले. तसेच या कालावधीतील सर्व गरोदर मातांची एचआयव्ही व सिफिलिस चाचणी झाली.

तसेच अतिजोखीम गटात असणाऱ्या टीजी, एमएसएम, एफएसडब्ल्यु यांना अंत्योदय,आधार कार्ड, मतदान कार्ड, तसेच संजय गांधी निराधार योजनेचा पाठपुराव व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा समुदाय संसाधन समूह स्थापन करण्यात आले असून त्या अंतर्गत अतिजोखिम गटातील समुहाला मिळणाऱ्या शासकीय योजना संदर्भात येणाऱ्या कागदपत्राच्या अडचणीबाबत उपाययोजना करण्याच्य सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील अतिजोखीम गटात असणाऱ्या समुदायातील प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करावे. तसेच एचआयव्ही सह जगणाऱ्यासाठी शासनाची मोफत बस पास योजना, एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांसाठी बाल संगोपन योजना व मिशन वात्सल्य योजना, तसेच विमा कवचसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या.

आढावा सभे दरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात यावर्षात राबविण्यात आलेल्या मॅराथॉन स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, माध्यमिक शिक्षकांची कार्यशाळा, पोलीस कार्यशाळा, रेल्वे कर्मचाऱ्यांची कार्यशाळा, महाविद्यालय स्तरावर संवेदीकरण कार्यशाळा, ग्राम पंचायत स्तरावर बैठका, कामगार कल्याण मंडळाची कार्यशाळा, 15 संवेदनशील गावांमध्ये पथनाट्य, प्लॅश मौब व एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांना पौष्टिक आहार वाटप या बद्दल सविस्तर माहिती दिली.

आढावा सभेला संबोधन ट्रस्ट, संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, क्राईस्ट हॉस्पीटल, प्लॅन इंडिया आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये