ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियानाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी विनय गौडा व मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणार आहे. अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद येथे तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण घेण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक आरोग्य सेविका, गटप्रवर्तक व आशा वर्कर यांचे प्रशिक्षण पूर्ण करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.मोहनीश गिरी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमचंद कन्नाके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.प्रकाश साठे, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ.संदीप गेडाम, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.ललित पटले व जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधीक्षक, तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी उज्वला सातपुते, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ.किशोर भट्टाचार्य, जिल्हा सिकलसेल समन्वयक संतोष चात्रेश्वर उपस्थित होते.

 सिकलसेल मुक्त चंद्रपूर जिल्हा घडविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी सिकलसेल आजाराची पार्श्वभूमी, तपासणी प्रक्रिया, रुग्ण व्यवस्थापन व अभियानाची अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

अभियान दरम्यान 1) 15 ते 20 जानेवारी सिकलसेल रुग्ण व सिकलसेल वाहक व्यक्तींची यादी करणे, 2) 21 ते 26 जानेवारी 0 ते 40 वर्ष वयोगटातील व्यक्तीची सिकलसेल तपासणी, 3) 27 जानेवारी ते 3 फेब्रुवारी आवश्यकतेनुसार एचपीएलसी (इलेक्ट्रोफोरोसीस) टेस्ट करण्यात येणार, 4) 4 ते 7 फेब्रुवारी विवाहपूर्व व प्रसूतीपूर्व समुपदेशन करण्यात येणार आहे.

सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियानाची प्रभावीपणे जनजागृती करण्यासाठी आरोग्यमंत्री यांच्या स्वाक्षरीचे पत्र प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहचवणे तसेच सरपंच, सिकलसेल अभियान आवाहन संदेशाचा व्हिडीओ तयार करून अभियानाबाबत जनजागृती करणे. प्राथमिक व माध्यमिक शाळा, आश्रम शाळा व महाविद्यालय येथे जनजागृती सत्र आयोजित करणे, शाळेतील विद्यार्थ्यामार्फत प्रभात फेरी काढणे, रांगोळी व निबंध स्पर्धाचे आयोजन करणे, महिला मंडळ व बचत गट सभा आयोजित करणे, दवंडी व मायकिंग करणे याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये