महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या चंद्रपुरात भव्य बाईक रॅली

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना व आरपीआय (आठवले गट) यांच्या संयुक्त विद्यमाने महायुतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली मंगळवार, दिनांक १३ जानेवारी २०२६ रोजी दुपारी २ वाजता चंद्रपूर शहरात उत्साहात पार पडणार आहे.
या भव्य बाईक रॅलीला पालकमंत्री अशोक उईक, आमदार सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार किशोर जोरगेवार, आमदार चैनसुख संचेती, माजी खासदार अशोक नेते, शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक किरणे पांडव यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा मोठा सहभाग या रॅलीत राहणार आहे.
ही भव्य बाईक रॅली नेहरू नगर जॉगर्स पार्क, बंगाली कॅम्प येथून प्रारंभ होणार असून आदर्श पेट्रोल पंप, सी.एच.एल. हॉस्पिटल, गुरुद्वारा, रहमतनगर रोड मार्गे बिनबा गेट, रामनगर चौक, दीक्षाभूमी, तुकूम मार्गे ट्रॅफिक ऑफिस, हनुमान मंदिर बिनबा गेट, बजाज पॉलिटेक्निक, मिलन चौक तसेच पठाणपुरा रोड मार्गे जोडदेऊळ चौक असा मार्ग पार करत समारोप होणार आहे. महायुतीच्या विकासकामांचा संदेश घराघरात पोहोचवणे तसेच महानगरपालिका निवडणुकीत भाजप व मित्रपक्षांच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा मिळवणे, हा या बाईक रॅलीचा मुख्य उद्देश आहे. युवकांचा जोश, शिस्तबद्ध सहभाग आणि घोषणांनी चंद्रपूर शहरात राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. या भव्य बाईक रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.



