संयुक्त महिला समितीचा सुमठाणा येथे सामाजिक उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
संयुक्त महिला समिती, पॉवरग्रीड यांच्या वतीने दिनांक ८ जानेवारी २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, जुने सुमठाणा येथे सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत गरजू ६३ विद्यार्थ्यांना शालेय पिशव्या व पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक गरजा पूर्ण होण्यास मदत होणार असून शिक्षणाबाबत त्यांच्यात सकारात्मक प्रेरणा निर्माण होईल, अशी भावना समितीच्या अध्यक्षा रुतिका बोरकर यांनी व्यक्त केली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने संयुक्त महिला समितीचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. त्यांच्या सामाजिक जाणिवेचे व उदारतेचे विशेष कौतुक करत, अशा उपक्रमांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकून राहण्यासाठी मोठे बळ मिळत असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
समाजातील दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी संयुक्त महिला समिती, पॉवरग्रीड सातत्याने कार्यरत असल्याचे या उपक्रमातून अधोरेखित झाले. याप्रसंगी रुणाली कटारे, रुपाली पाल तसेच संयुक्त महिला समितीच्या सर्व पदाधिकारी उपस्थित होत्या.



