शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
गुंडावार पेट्रोल पंप चौकात वाहतूक पोलीस नेमण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
शहरातील सेन्टेनिस व जिजामाता शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, गुंडावार पेट्रोल पंप चौकात वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, अशी मागणी नगर परिषद भद्रावतीचे माजी नियोजन व बांधकाम सभापती निलेश अ. देवईकर यांनी केली आहे.
याबाबत त्यांनी भद्रावती पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांना लेखी निवेदन सादर केले आहे.
सदर चौकातून सकाळी ८.१५ ते ९ वाजेदरम्यान तसेच दुपारी ३ ते ४ वाजेदरम्यान शाळकरी मुले ये-जा करीत असतात. मात्र, याच वेळेत हायवेवरून जड व अवजड वाहने भरधाव वेगाने धावत असल्याने अपघाताची भीती कायम असते. यापूर्वीही या मार्गावर अनेक अपघात घडले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांचे प्राण धोक्यात येऊ नयेत व भविष्यातील अपघात टाळण्यासाठी सदर वेळेत गुंडावार पेट्रोल पंप चौकात एक वाहतूक पोलीस कर्मचारी नेमण्यात यावा, अशी मागणी देवईकर यांनी केली आहे. वाहतूक नियंत्रणात राहिल्यास लहान मुलांचे जीव वाचू शकतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, पालकवर्गातूनही या मागणीला पाठिंबा मिळत असून, प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.याप्रसंगी संतोष कोपावार,रवी पाठक,मनोज कृष्णन,प्रमोद पारखी उपस्थित होते.



