जिल्हा परिषद शाळा तपोवन येथील चिमुकल्यांनी गिरवले व्यवहार ज्ञानाचे धडे
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तपोवन गोंधन केंद्र टेंभुर्णी ता. जाफ्राबाद येथे आंनददायी शनिवार या उपक्रम अंतर्गत बाल बाजार (आनंद नगरी )भरवण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन शाळा समिती अध्यक्ष परसराम फलके, सरपंच अंजनाताई समाधान फलके, उपाध्यक्ष अनिल फलके यांनी फित कापून नारळ फोडून बाल बाजाराचे उदघाटन केले यावेळी सिद्धार्थ हिवाळे,परसराम चौधरी, गावचे पोलीस पाटील , तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी फलके, ग्राम पंचायत चे सर्व पदाधिकारी तसेच सर्व गावकरी माता भगिनी उपस्थित होते.
पुस्तकी ज्ञानाला जेंव्हा व्यवहार ज्ञानाची जोड मिळते, तेव्हा खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो हे या ठिकाणी पाहायला मिळाले.
सर्व विद्यार्थ्यांनी छोटे छोटे दुकाने लावून आपल्या घरात बनवलेले वडापाव, समोसा, पापड, भाजी चिवडा, जामुन, पॅटिस, चहा, पदार्थ विक्रीसाठी आणले होते.
काही विद्यार्थ्यांनी तर आपल्या शेतात पिकणारा भाजीपाला सुद्धा विक्री साठी आणला होता. अशा विविध स्टॉल च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष व्यवहाराचा अनुभव घेतला. व्यावहारिक ज्ञान, हिशोबाची अचूकता,आणि नफा तोटा समजून घेणे, हा या मागचा उद्देश होता.
या बाल बाजारासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री राजेंद्र दंदाले,संतोष नागरे,जगदीश डोईफोडे, कैलास चेके, व श्रीमती किरणबेबी लहाने मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांची उद्योजकतेकडे वाटचाल झाल्याचे पहायाला मिळाले.
सर्व गावकऱ्यांनी या बालगोपाळाचे कौतुक केले.



