सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकऱ्यांनो ई-पीक पाहणी पूर्ण करा
अन्यथा शासकीय लाभांपासून वंचित राहाल : तहसीलदार अजित दिवटे यांचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सिंदखेडराजा तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांची नोंदणी करण्यासाठी ‘ई-पीक पाहणी’ मोहिमेने वेग घेतला असला तरी, अद्याप पावेतो हजारो शेतकरी या प्रक्रियेपासून दूर असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील पीक पाहणीची अत्यंत संथ गती पाहता, तहसीलदार अजित दिवटे यांनी शेतकऱ्यांना कडक शब्दांत आवाहन केले असून, तातडीने ई-पीक पाहणी पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
*लक्ष्य मोठे, पण नोंदणी अत्यल्प*
मिळालेल्या माहितीनुसार, एकूण ७ लाख ९९ हजार १९५ ओनर (प्लॉट) ई-पीक पाहणीसाठी अपेक्षित आहेत. मात्र, प्रशासकीय आकडेवारीनुसार आतापर्यंत केवळ ८० हजार २८ प्लॉटवरच नोंदणी पूर्ण झाली आहे. हे प्रमाण अतिशय कमी असून, हजारो प्लॉटची नोंदणी अद्याप प्रलंबित आहे. ही परिस्थिती पाहता, शेवटच्या क्षणी होणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी त्वरित पुढाकार घेणे गरजेचे आहे.
तहसीलदार अजित दिवटे यांनी स्पष्ट केले की, ई-पीक पाहणी ही केवळ एक तांत्रिक प्रक्रिया नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक सुरक्षेशी जोडलेली आहे. जर शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची नोंद केली नाही, तर त्यांना खालील समस्यांना सामोरे जावे लागू शकते: पीक विम्याचा लाभ मिळवण्यासाठी सातबाऱ्यावर पिकाची नोंद असणे अनिवार्य आहे., अतिवृष्टी किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास, शासकीय मदत मिळवण्यासाठी ई-पीक पाहणीचा आधार घेतला जातो, शासकीय खरेदी केंद्रावर धान्य विक्री करण्यासाठी पीक पेरा नोंदवलेला असणे आवश्यक आहे, पीक कर्जाच्या नूतनीकरणासाठी देखील या नोंदीची तपासणी केली जाते.ज्या शेतकरी बांधवांकडे अँड्रॉइड मोबाईल नाही किंवा ज्यांना तंत्रज्ञान हाताळण्यात अडचण येत आहे.
अशा शेतकऱ्यांनी आपल्या कुटुंबातील तरुण सदस्यांची किंवा गावातील सुशिक्षित सहकाऱ्यांची मदत घ्यावी. तसेच, ॲपमध्ये काही तांत्रिक बिघाड किंवा नोंदणी करताना समस्या येत असल्यास, त्वरित आपल्या संबंधित ग्राम महसूल तलाठी किंवा महसूल सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.शेतकऱ्यांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता आजच आपल्या रब्बी पिकांची नोंदणी मोबाईलद्वारे करावी. ई-पीक पाहणी न केल्यास भविष्यात मिळणाऱ्या शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहावे लागेल, त्याला सर्वस्वी शेतकरी जबाबदार राहतील,” असे तहसीलदार अजित दिवटे यांनी आव्हान केले आहे.
आपल्या मोबाईलमधील. ‘ई-पीक पाहणी’ व्हर्जन तपासून नवीन व्हर्जन डाऊनलोड करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी.
असे आवाहन तहसीलदार अजित दिवटे यांनी केले आहे.



