लाडक्या बहिणींच्या हक्काला विरोध करणाऱ्या काँग्रेसला मतदारांनी धडा शिकवावा _ आ. सुधीर मुनगंटीवार
भाजपा महायुतीच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून द्या

चांदा ब्लास्ट
प्रभाग ६, ११ व १२ मध्ये आ. मुनगंटीवार यांची जाहीर सभा, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
चंद्रपूर : मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेला काँग्रेसने जाणीवपूर्वक विरोध केला असून, जनतेचा पैसा थेट जनतेच्या खात्यात जात असताना काँग्रेसच्या नेत्यांना पोटदुखी झाली होती. ही योजना बंद पाडण्यासाठी काँग्रेसचे लोक थेट न्यायालयात गेले, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सावत्र भाऊसुद्धा असे काम करणार नाही, इतकी असंवेदनशील भूमिका काँग्रेसने घेतली आहे. अशा काँग्रेसला योग्य धडा शिकवण्यासाठी नागरिकांनी आपले अमूल्य मत चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत उभे असलेल्या भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांना द्यावे, असे आवाहन राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ६, ११ आणि १२ मधील भाजपा–शिवसेना-आरपीआय (आठवलेगट) महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी इंडस्ट्रियल एरिया, कन्नमवार चौक, भानापेठ वार्ड येथे आयोजित जाहीर सभेत भाजपाचे नेते आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मतदारांना ठाम शब्दांत आवाहन केले. केंद्रात, राज्यात भाजपाचे सरकार आहे. आणि आता चंद्रपूर महानगरपालिकेतही महायुतीचे सरकार असणे चंद्रपूर शहराच्या विकासासाठी अत्यावश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी या सभेत प्रभाग क्रमांक ११ मधील भाजपा, शिवसेना आणि आरपीआय (आठवले गट ) महायुतीचे अधिकृत उमेदवार सुरज पेदूलवार, आशा अबोजवार, संजय कंचर्लावार, माला पेंदाम व प्रभाग क्रमांक १२ चे महायुतीचे उमेदवार प्रज्वलंत कडू, पुष्पा दहागावकर, राजेंद्र शास्त्रकार, अवीता लडके आणि प्रभाग क्रमांक ६ मधील महायुतीचे अधिकृत उमेदवार सुनीता जैस्वाल, महेश झिटे, राजलक्ष्मी कारंगल व चंद्रशेखर शेट्टी हे १२ ही उमेदवार केवळ नगरसेवक म्हणून नव्हे तर प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणारे लोकप्रतिनिधी ठरतील.
लहानपणापासून या परिसराशी माझी नाळ जोडलेली आहे. हे उमेदवार जनतेच्या विश्वासावर खरे उतरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१२ ही उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन करत आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करणे हीच खरी जबाबदारी आहे. चंद्रपूर शहरासाठी मेडिकल कॉलेज, कॅन्सर हॉस्पिटल, रामसेतू, बाबा आमटे अभ्यासिका, इंजिनिअरिंग कॉलेज, वन अकादमी, बॉटनिकल गार्डन, सैनिक शाळा, रस्ते, पिण्याचे पाणी, जिल्हा परिषद इमारत, GST भवन, १० हजार घरे व ऑटोचालकांसाठी अल्पदरातील घरांचा निर्णय यासारखी महत्त्वाची कामे एकसंध सरकारमुळेच मार्गी लागल्याचे त्यांनी नमूद केले.
आ. मुनगंटीवार म्हणाले की, राज्य व केंद्र सरकारकडून निधी आणण्याची जबाबदारी आमची आहे. मालमत्ता कर किंवा अन्य कर वाढवून विकास करणे हा आमचा मार्ग नाही. समाजकल्याण विभागाचा निधी असो किंवा गोरगरिबांसाठीचा कार्यक्रम, एक रुपयाही कमी पडू दिला जाणार नाही.काँग्रेसवर टीका करताना त्यांनी काँग्रेसचे राजकारण हे विकासाऐवजी जातीपातीवर आधारित असल्याचा आरोप केला. अनेक वर्षे सत्ता असूनही काँग्रेसने गरिबांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचे सांगत त्यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केला. रक्षाबंधनापासून भाऊबीजेपर्यंत लाखो बहिणींच्या खात्यात थेट पंधराशे रुपये जमा झाले असून हा निर्णय महायुती सरकारने घेतल्याचे त्यांनी सांगितले.
चंद्रपूर शहरासाठी पुढील काळात दहा हजार घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राबवण्याचा संकल्प असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी ठाम शब्दांत आवाहन केले की, चंद्रपूर महानगरपालिकेतही महायुतीचे सरकार आणण्यासाठी, भाजपा महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या पाठीशी मतदारांनी खंबीरपणे उभे राहावे.



