राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेत भद्रावतीच्या ‘सार’ अबॅकस अकॅडमीचे घवघवीत यश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
जैन कलार समाज भवन, रेशीमबाग चौक, उमरेड रोड येथे नुकतीच राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील सार अबॅकस अकॅडमीचा विद्यार्थी आरुष रवी गेडाम याने अवघ्या ६ मिनिटे ४१ सेकंदात १०० पैकी १०० प्रश्न अचूक सोडवत चॅम्पियन होण्याचा मान पटकावला.
या स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांमधून विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. छत्तीसगड, गोवा, पुणे, भंडारा, नागपूर, भुसावळ, यवतमाळ, एरंडोल, चंद्रपूर, भद्रावती, आग्रा, दिल्ली, जबलपूर, मुंबई, पालघर तसेच मध्य प्रदेश येथील विद्यार्थ्यांनी आपल्या वेगवान व अचूक गणनशक्तीचे प्रदर्शन केले.
स्पर्धेचे उद्घाटन विशाल कोहिटे, विवेक आगासे, सफिर अहमद आणि राजेश मसूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांची वेगवान गणनाशक्ती, अचूकता आणि एकाग्रता यांचे मूल्यमापन करण्यात आले.
आरुष रवी गेडाम हा नारायणा विद्यालय, पडोली येथील विद्यार्थी असून, त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पालक, शिक्षक आणि आयोजकांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन करत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सार अबॅकस अकॅडमीच्या संचालिका रजनी विनोद बावणे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपली गणितीय क्षमता व एकाग्रता वाढविण्यासाठी अबॅकस प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकांना केले.
या यशामुळे भद्रावती, चंद्रपूर तसेच नागपूर शहराचे नाव राष्ट्रीय स्तरावर उजळले आहे. स्पर्धेचे आयोजन अबॅकस अकॅडमी, नागपूर यांनी केले असून संचालन व आभार प्रदर्शन दीक्षा खानोलकर यांनी केले.



