ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गत वर्षभरात नायलॉन मांजाप्रकरणी 28 जणांवर गुन्हे दाखल

एकूण 5 लक्ष 56 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक लोक जखमी होतात किंवा काही जणांचा मृत्यु होतो. त्यामुळे उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतली असून विक्री व वापर कर्त्यांविरुध्द शिक्षेची तसेच दंडात्मक कारवाई किंवा दोन्ही बाबींची तरतूद करण्यात आली आहे.

याच अनुषंगाने जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या मार्गदर्शनात जिल्हा प्रशासनाने सुध्दा नायलॉन मांजा विक्री करणारे व त्याचा वापर करणा-यांविरुध्द कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. गत वर्षभरात म्हणजे जानेवारी ते डिसेंबर 2025 या कालावधीत 26 प्रकरणांमध्ये एकूण 28 जणांविरुध्द गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई तर 5 लक्ष 56 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गतवर्षी दाखल गुन्ह्यांमध्ये चंद्रपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये 8 आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून 1 लक्ष 61 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रामनगर पोलिस स्टेशनमध्ये नायलॉन मांजासंदर्भात 5 आरोपींवर गुन्हा दाखल तर 1 लक्ष 71 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त, मुल पोलिस स्टेशनमध्ये 3 आरोपी, 56 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल, राजुरा पो.स्टे मध्ये 2 आरोपी व 7800 रुपयांचा मुद्देमाल, भद्रावती पो.स्टे 2 आरोपी व 13 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल, घुग्घुस पो.स्टे 1 आरोपी व 3200 रुपयांचा मुद्देमाल, दुर्गापूर पो.स्टे 1 आरोपी व 60 हजार रुपयांचा मुद्देमाल, वरोरा पो.स्टे 2 आरोपी व 54 हजार रुपयांचा मुद्देमाल, कोठारी पो.स्टे 1 आरोपी व 4 हजार रुपयांचा मुद्देमाल, बल्लारपूर पो.स्टे 1 आरोपी व 8 हजार रुपयांचा मुद्देमाल, गडचांदूर पो.स्टे 1 आरोपी व 2 हजार रुपयांचा मुद्देमाल तर सिंदेवाही पोलिस स्टेशनमध्ये 1 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करून 14 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

नायलॉन मांजाचा वापर अतिशय धोकादायक आहे. नायलॉन मांजा वापर करणारे तसेच त्याची विक्री करणारे विक्रेते नागरिकांच्या दुर्घटनेसाठी जबाबदार आहे. अशा विक्रेत्यांविरोधात यंत्रणेने सक्त कारवाई करावी. त्यासाठी संयुक्त पथकांचे गठन करून बाजारात किंवा विक्री होत असलेल्या भागात नियमित गस्त घालावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये