पदयात्रा आणि कॉर्नर सभेतून आमदार किशोर जोरगेवार प्रचाराच्या मैदानात

चांदा ब्लास्ट
शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस अधिकच वेग घेत असून, या प्रचारात भारतीय जनता पार्टीने स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे प्रत्यक्ष मैदानात उतरले असून, पदयात्रा आणि कॉर्नर सभांच्या माध्यमातून त्यांनी प्रचाराला नवी धार दिली आहे.
आमदार किशोर जोरगेवार यांनी बंगाली कॅम्प प्रभागात पदयात्रा काढून महायुतीच्या उमेदवारांसाठी नागरिकांकडे थेट मतदानाचे आवाहन केले. या पदयात्रेदरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, घरपट्टे, आरोग्य सुविधा यासह विविध स्थानिक प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली.
या पदयात्रेत जयश्री जुमडे, आकाश मस्के, सारिका संदुरकर, रॉबीन बिश्वास यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संध्याकाळी सुरू झालेली ही पदयात्रा श्याम नगर, फुकट नगर, रमाबाई नगर मार्गे शास्त्रीकार ले-आउट होत अखेर बंगाली कॅम्प परिसरात पोहोचली.
पदयात्रेदरम्यान विविध ठिकाणी छोट्या कॉर्नर सभांचे आयोजन करण्यात आले होते. या सभांमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विकासात्मक योजनांची माहिती देत, त्या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मिळालेला पाठिंबा पाहता प्रचाराला निश्चितच बळ मिळाल्याचे चित्र दिसून आले.
महायुतीच्या माध्यमातून चंद्रपूर शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला.



