जन्म – मृत्यु नोंदणीबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा

चांदा ब्लास्ट
नवजात बालकांच्या जन्माची नोंद तसेच मृत्यु पावलेल्या नागरिकांची नोंद अचूक आणि तात्काळ करण्यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि. 8) आरोग्य विभागाशी संलग्न यंत्रणेची बैठक घेऊन आढावा घेतला.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) मिना साळूंके यांच्यासह गटविकास अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, वेळेवर जन्म – मृत्यु नोंदणी करणे अतिशय आवश्यक झाले आहे. नागरिकत्वाच्या पुराव्याकरीता ही कागदपत्रे महत्वाची असून सदर नोंदणी किंवा प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कोणतीही हयगय करू नये. जन्म कुठे झाला, कोणती तारीख, आई-वडीलांचे नाव याबाबी नोंदणी करतांन न चुकता घ्याव्यात. तसेच नोंदणी करण्यास उशीर झाला तर अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागात आशा स्वयंसेविकांना याबाबत अवगत करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
जन्म – मृत्यु घटनांची विलंबाने माहिती देणा-या किंवा माहिती देण्यास टाळाटाळ करणा-या खाजगी रुग्णालयांना सुधारीत कायद्यानुसार आता 1 हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. महिला व बालकल्याण विकास विभागाच्या 14 मार्च 2024 च्या शासन निर्णयान्वये शासकीय दस्तऐवजांवर आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार 1 मे 2024 नंतर जन्मलेल्या बालकांच्या प्रमाणपत्रामध्ये बालकाचे नाव, आईचे नाव, वडीलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरुपाची नोंद करण्यात येते.



