ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

किटकजन्य आजारावर मात! हवी नागरिकांची साथ

आरोग्य विभागासोबतच नागरिकांनीसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक

चांदा ब्लास्ट

पावसाळा सुरू झाला आहे. या काळात किटकजन्य व जलजन्य आजार झपाट्याने पसरतात. या आजाराला दूर करण्यासाठी आरोग्य विभागासोबतच नागरिकांनीसुध्दा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.

साधारणत: पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकूनगुणिया,जे.ई. हे आजार प्रामुख्याने वाढतात. आजार वाढण्याचे प्रमुख कारण म्हणजे डासाच्या घनतेत वाढ होते. पावसाळ्यात घराभोवती व परिसरात पाण्याचे डबके तयार होतात. या डबक्यातच डास अंडी टाकतात व डासाची उत्पती होऊन डास घनता वाढते. डेंग्यू, मलेरिया साथीच्या आजारांना रोखायचे असेल तर काळजी घेणे हाच सर्वोत्तम उपचार आहे. यंदा ही साथ वेळीच रोखण्यासाठी नागरिकांनी आत्तापासून सावध राहावे, असे आवाहन चंद्रपूर आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

पावसामुळे रहिवासी परिसर, गोडाऊन, मोकळ्या जागा, खड्डे या ठिकाणी साठणारी पाण्याची डबकी वेळोवेळी नष्ट करा, पाणी वाहते करा किंवा शक्य नसेल तर ऑइल, केरोसिनचे दोन – चार थेंब नियमित टाका आणि डासाची पैदास टाळावी. पाण्याची सर्व भांडी हवाबंद कापडाने झाकावीत. इमारतीच्या छतावर पाणी साचणार नाही, याची दक्षता  घ्यावी. पक्षी, गुरांच्या पाण्याची भांडी साफ करावीत. घरातील कूलर, फ्रीजचे ट्रीप पॅन नियमित साफ करा. गटारे वाहती करावी, छोटे छोटे खड्डे डबकी बुजवावीत. सांडपाण्यासाठी शोषखड्डे तयार करावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

एडिस इजिप्ती या डासापासून डेंग्यूची लागण होते. हा मानवी वस्तीजवळ अधिक आढळतो. भांडी, निरुपयोगी टायर, फुलदाण्या, नारळाच्या करवंडया यासह अन्य ठिकाणी पाणी साठून राहिल्यास एडिस इजिप्ती या डासाची पैदास होते. पावसाळ्यात ही पैदास झपाट्याने होते. त्यामुळे आपल्या परिसरात कुठे पाणी साचलेले नाही ना ?त्यात अळया तर नाहीत ना, याची खात्री करून घ्यावी. एकदा घर, इमारत, परिसरातील  साठलेल्या पाण्याची ठिकाणे रिकामी करावी. ज्या ठिकाणी पाणी साचून अळ्या तयार होण्याची भीती आहे, अश्या वस्तु काढून टाकाव्यात. घराच्या परिसरात भंगार वस्तु किंवा बांधकाम साहित्याचा साठा करू नये. पाण्याच्या टाक्या साफ ठेवाव्यात,

दरम्यान घराबाहेर पडतांना किंवा घरात पूर्ण अंग झाकतील, असे कपडे घालावेत. डास चावू नये म्हणून डासरोधक मलम, अगरबत्ती, ई. चा वापर करावा. झोपतांनी मच्छरदाणीचा वापर करावा. घराच्या खिडक्यांना जाळी बसवावी. अडचणीच्या ठिकाणी किंवा डासाची पैदास होते, अशा ठिकाणी जाणे टाळावे. कुंड्या मध्ये पाणी राहणार नाही याची काळजी घ्यावी, आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा,  असेही आवाहन जि.प.आरोग्य विभागाने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये