वनसडी – कवठाळा मार्गावरील पूलांचे कामे कासवगतीने!
प्रवासात अडचण ; रस्त्याची झाली दुर्दशा
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना :- वनसडी – अंतरगाव – कवठाळा मार्गावर असलेल्या नाल्यावरील पुलाची कामे पुन्हा नव्याने केली जात आहे. परंतु ही कामे अत्यंत कासवगतीने सुरू असल्याने वाहतूकदारांची डोकेदुखी वाढली आहे.
यांमुळे पुलाच्या कामाचा वेग वाढवण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
वनसडी ते कवठाळा हा अतिशय महत्वपूर्ण मार्ग आहे.या मार्गावरून वणी, शिंदोला,आवारपुर ,भोयगाव, चंद्रपूर,कोरपना, घुघुस , गडचांदुर पैनगंगा कोळसा खान आदी महत्त्वाचे स्थानी जाणारे जोडले आहे. शिवाय चंद्रपूर व कोरपना तालुक्याला जोडणारा सर्वात कमी अंतराचा मार्ग असल्याने वाहतूकदार याच मार्गाला अधिक पसंती देतात. परंतु अलीकडच्या काळात या मार्गावर सिमेंट, कोळसा आदी उद्योग निर्माण झाल्याने वाहतुकीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मार्ग वाहतुकीच्या दृष्टीने अपुरा पडतो आहे. यातच वाहतुकीची कोंडी निर्माण होते आहे. या अनुषंगाने मार्गाचे कामाला वेग देण्याची गरज बांधकाम विभागाकडे व्यक्त होत आहे.
गतिरोधक ठरतेय जीव घेणे
सदर मार्गावर सांगोडा फाटा , दालमिया चौपाटी, शिवनारडा, नारंडा फाटा येथे गतिरोधक तयार करण्यात आले आहे. परंतु या गतिरोधकांना मापदंड नाही. तसेच रंगरंगोटी व सूचनाफलक नसल्याने रात्रीच्या अंधारात ते दृष्टीक्षेपास पडत नाही. परिणामी अपघाताचे प्रमाण वाढले आहे. याच सोबत रस्त्यावरही जागोजागी खड्डे पडल्याने वाहने चालवणे जिकिरीचे ठरत आहे.
ते चुकीचे फलक सुधारण्याची गरज
सांगोडा फाटा येथे मार्गावर हिरापूर, सांगोडा गावाचे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. या फलकातील इंग्रजी आद्याक्षरातील नावे योग्य छापली आहे.
परंतु मराठी आद्य अक्षरात असलेली नावे या मार्गावर नसलेल्या गावांची आहे. त्यामुळे नवीन प्रवाशांची दिशाभूल होत आहे. यासाठी मराठी आद्य अक्षरातील नावे सुधारण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. याच बरोबर नारंडा येथील दालमिया चौपाटीवरील फलकात असलेले आसन काढून कढोली खु किंवा आवारपूर नावाचे गाव दर्शविणे अधिक महत्त्वाचे आहे.



