प्रा. गंगाधर लांडगे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी समाजाच्या सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तनाचा सखोल अभ्यास करणाऱ्या संशोधनासाठी विदर्भ कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स जिवती येथील कार्यरत (समाजशास्त्र विभाग प्रमुख) प्रा. गंगाधर लांडगे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्याकडून आचार्य (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली आहे.
“चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी जमातींचे सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन : एक समाजशास्त्रीय अध्ययन (गोंड, कोलाम व परधान जमातीच्या विशेष संदर्भात) या विषयावर त्यांनी संशोधन प्रबंध सादर केला. सदर संशोधनाला डॉ. अशोक ए. मोटे, शिवाजी महाविद्यालय, रेणापूर यांनी मार्गदर्शन केले.
या संशोधनातून गोंड, कोलाम व परधान जमातींच्या पारंपरिक जीवनपद्धती, सामाजिक रचना, सांस्कृतिक मूल्ये तसेच आधुनिकतेमुळे होत असलेले बदल यांचे समाजशास्त्रीय विश्लेषण मांडण्यात आले आहे. आदिवासी समाजातील परिवर्तनाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी हे संशोधन महत्त्वपूर्ण ठरणारे आहे.
प्रा. गंगाधर लांडगे यांच्या या शैक्षणिक यशाबद्दल विदर्भ कॉलेज जिवती व शिक्षण क्षेत्रातून तसेच सामाजिक वर्तुळातून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्यामुळे आदिवासी अभ्यासाच्या क्षेत्रात मोलाची भर पडली असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.
हे यश त्यांच्या अथक परिश्रम जिद्द, चिकाटी मुळे प्राप्त झाले, तसेच त्यांनी या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला श्री. व्यंकटेश बहुउद्देशीय संस्था गडचांदुर चे सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच मित्र परिवाराला दिले.



