पोंभुर्णा येथील जेष्ठ पत्रकारांचा सपत्नीक सन्मान सोहळा
माजी मंत्री तथा आमदार डॉ. सुधीर मुनगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर
पोंभुर्णा :- तालुका पत्रकार संघाच्या वतीने पोंभुर्णा तालुक्यातील जेष्ठ पत्रकारांचा जीवनगौरव पुरस्कार व सपत्नीक सन्मान सोहळा दि.६ जानेवारी रोज मंगळवारला पोंभुर्णा येथील पत्रकार भवनात मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे मुख्य अतिथी बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार तथा माजी मंत्री डॉ.सुधीर मुनगंटीवार,प्रमुख पाहुणे नगराध्यक्षा सुलभा पिपरे, उपनगराध्यक्ष अजित मंगळगिरीवार, तहसीलदार मोहनीश शेलवटकर,माजी सभापती अल्का आत्राम, पत्रकार संघाचे अध्यक्ष पी.एच.गोरंतवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांबेकर यांच्या प्रतिमा माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी बोलताना डॉ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी पत्रकार परफेक्टच असणे गरजेचे असून पत्रकारितेत कोणत्याही प्रकारचा तडजोडीचा मार्ग स्वीकारू नये. ग्रामीण पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी आपण अर्थमंत्री असताना १५ कोटी रुपयांचा निधी तत्काळ मंजूर केला, असे त्यांनी सांगितले. तसेच पत्रकार संरक्षण कायदा अधिक कठोर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
संभाजीनगर दौरा रद्द झाल्यानंतरही वर्तमानपत्रातील बातम्यांमुळे अनेक नागरिकांनी भेटीसाठी फोन केल्याचा अनुभव सांगत, आजही वर्तमानपत्रांवर वाचकांचा विश्वास अबाधित आहे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोंभुर्णा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष पी.एच. गोरंतवार यांनी केले. संचालन प्राशिक माणके यांनी तर आभार प्रदर्शन भैरव दिवसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार आशिष कावटवार, पंकज वड्डेटीवार, भुजंग ढोले, इकबाल कुरेशी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
यावेळी जेष्ठ पत्रकार निलकंठ ठाकरे, जीवनदास गेडाम, दिलीप मैकलवार, निलकंठ नैताम, सुरेश कोमावार, विजय वासेकर, विकास शेडमाके, बबन गोरंतवार यांचा सपत्नीक जीवनगौरव पुरस्काराने सत्कार करण्यात आला.



