मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिनी केला दिव्यांग लेकरांचा सन्मान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्थानिक मातृतीर्थ सभागृहामध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती करण्यात आली. या कार्यक्रमात विशेष दिव्यांग लेकरांचा सन्मान सोहळा प्रामुख्याने घेण्यात आला आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर यावेळी प्रकाश टाकण्यात आला तसेच यावेळी दिव्यांग लेकरांचा सन्मान सोहळा आयोजित केला होता त्यामध्ये संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा राऊत या बोलताना म्हणाल्या की,दिव्यांग लेकरांचा सोहळा हा आज आम्हाला आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती केल्याचे खरे समाधान मिळालेले आहे. दिव्यांग हे जन्मताच जरी दिव्यांग असले तरी त्यांच्यातील ऊर्जा शक्ती आणि जीवनाचे ध्येय गाठण्याची उमेद ही आज त्यांच्या परिवाराकडून आणि या मुलांमधून दिसली आहे तर खरोखर असा जर सन्मान सोहळा व कौतुकाची थाप जर मिळाली तर जीवन हे आणखी उमेदीने लढण्याचे स्वप्न हे दिव्यांग बांधव करतील.
मातृतीर्थ पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग लेकरांच्या सन्मान सोहळ्यात समाजातील संघर्ष, जिद्द आणि आशेचे दर्शन घडले.
या सन्मान सोहळ्यास प्रमुख उपस्थिती म्हणून सौ. दिपाली झोरे, सौ. पाखरे, सौ. गवई, सौ. दंदाले तसेच अंकुश सावजी उपस्थित होते.
यावेळी मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्ष सुषमा राऊत, नवनिर्वाचित अध्यक्ष ओमप्रकाश पराड, माजी अध्यक्ष संन्मती जैन, कोषाध्यक्ष गणेश मुंडे, उपाध्यक्ष रंजित खिल्लारे, सचिव जुनेद कुरेशी, सहसचिव रमेश चव्हाण, प्रसिद्धीप्रमुख भीमराव चाटे, तसेच प्रशांत पंडित, पंढरीनाथ गीते, राजेश सोनवणे व इतर पत्रकार बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमात मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने दिव्यांग लेकरांचा सन्मान देखील करण्यात आला. यावेळी दिव्यांग उत्कर्ष दंदाले याचे वडील दत्तात्रय दंदाले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, उत्कर्षला हा आजार जन्मताच नव्हता; ९ वर्षांचा झाल्यानंतर या दुर्मिळ आजाराची उत्पत्ती झाली. हा आजार दोन ते तीन हजार व्यक्तींमध्ये एखाद्यालाच आढळतो. या आजाराबाबत महाराष्ट्रच नव्हे तर भारतातही पुरेशी माहिती उपलब्ध नाही, तसेच यावर कोणतीही लस किंवा ठोस उपचार उपलब्ध नाहीत. कालांतराने हा आजार संपूर्ण शरीरात पसरून रुग्णाच्या नसा हळूहळू नष्ट करतो, अशी भावनिक माहिती त्यांनी दिली.
याच सोहळ्यात राधेय अनिल भैय्या यांनी अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत चारधाम यात्रा पूर्ण केल्याबद्दल त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करण्यात आला. तसेच गौरी रमेश झोरे, अवघ्या ५ वर्षांचा असून अंगणवाडी मधे शिकत आहे कपिल गवई व अर्णन पाखरे (वय १४) हा दहावीपर्यंत शिक्षण घेत असून, त्याचाही सन्मान करण्यात आला.
या सन्मानामुळे दिव्यांग मुलांच्या व त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावर समाधान व आनंदाचे हास्य फुलले. मनोगतात त्यांनी सांगितले की, असा सन्मान आम्ही आयुष्यात प्रथमच अनुभवत आहोत, त्यामुळे आत्मविश्वास वाढल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आयोजकांनी घेतलेल्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.
दिव्यांग मुलांच्या वेदना, संघर्ष आणि त्यांच्या कुटुंबियांच्या जिद्दीला समाजाने साथ देण्याची गरज असून, अशा उपक्रमांमधून सकारात्मक संदेश जात असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. यावेळी प्रास्ताविक सुषमा राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन रणजीत खिल्लारे यांनी केले.



