
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना — थंडीच्या कडाक्यात रस्त्यावर कुडकूत्या अवस्थेत असलेल्या एका मनोरुग्णाला रितेश रणदिवे यांनी मायेची उब देत मानवतेचे दर्शन घडवले. थंडीपासून संरक्षण व्हावे, यासाठी त्यांनी त्या मनोरुग्णाला ब्लँकेट देऊन तत्काळ मदत केली.
गेल्या काही दिवसांपासून परिसरात तापमानात मोठी घसरण झाली आहे. अशा परिस्थितीत रस्त्यावर राहणाऱ्या निराधार, मनोरुग्ण व्यक्तींच्या जीवाला धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात येताच सामाजिक बांधिलकी जपत रितेश श्याम रणदिवे यांनी कोणतीही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता मदतीचा हात पुढे केला.
ब्लँकेट मिळताच त्या मनोरुग्णाच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधान आणि दिलासा उपस्थितांचे मन हेलावून गेला. “समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचणे हीच खरी समाजसेवा,” असे मत रणदिवे यांनी व्यक्त केले. गरजूंना मदत करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगामुळे परिसरात मानवतेची भावना जागृत झाली असून, अनेकांनी रितेश रणदिवे यांच्या कार्याचे कौतुक केले आहे. थंडीच्या दिवसांत अशा उपक्रमांची नितांत गरज असून, प्रशासनासोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनीही पुढे येण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे.
ही छोटीशी मदत त्या कुडकूत्या जीवासाठी मोठा आधार ठरली असून, माणुसकी आजही जिवंत आहे याची प्रचिती या घटनेतून पुन्हा एकदा आली आहे.



