समर्थ कृषी महाविद्यालयात पत्रकार दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला अंतर्गत समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) युनिटच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे यांच्या हस्ते मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्प अर्पण करून झाली. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले नियतकालिक ‘दर्पण’ सुरू केले. त्या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ दरवर्षी ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन साजरा केला जातो असे सांगितले.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. देवानंद नागरे यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनकार्याचा सविस्तर आढावा घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रा. योगेश चगदळे यांनी पत्रकारिता हा समाजाचा आरसा असून समाजघडणीत निर्भीड व प्रामाणिक पत्रकारितेची आजच्या काळात नितांत गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच प्रा. सचिन सोळंकी यांनी विद्यार्थ्यांना नियमित वर्तमानपत्र वाचनाची सवय लावून वाचनसंस्कृती अंगीकारण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयात विविध वृत्तपत्रांचे वाचन करून पत्रकार दिन साजरा केला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पत्रकारिता, सामाजिक भान व वाचनाची आवड वाढीस लागल्याचे चित्र दिसून आले. वृत्तपत्र वाचन करण्यासाठी महाविद्यालयाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



