MSEB चा नांदा फाटा येथे अनागोंदी कारभार; गरिबांच्या संसारावर अंधाराचे सावट!
कोणतीही पूर्वसूचना न देता लाईन कपात ; अधिकार्यांची अरेरावी आणि मनमानी चव्हाट्यावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
नांदा फाटा : सध्याच्या धावपळीच्या युगात वीज ही मानवाची मूलभूत गरज बनली आहे. पोटाला चिमटा काढून गरीब माणूस वीज देयकाची तजवीज करतो, जेणेकरून आपल्या मुलाबाळांचे भविष्य प्रकाशमय व्हावे. मात्र, नांदा फाटा परिसरात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचा (MSEB) कारभार सध्या गरिबांच्या मुळावर उठला असल्याचे चित्र दिसत आहे. कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना न देता आणि नियम धाब्यावर बसवून गरिबांच्या घरची वीज कापली जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.
उद्दिष्टांच्या नावाखाली गरिबांवर अन्याय
मिळालेल्या माहितीनुसार, आपले वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी MSEB चे पथक नांदा परिसरात सक्रिय झाले आहे. विशेष म्हणजे, एरवी लाईन गेल्यावर तक्रार करूनही ढुंकूनही न पाहणारे अधिकारी आज मात्र घराघराची लाईन कापण्यासाठी गतीने फिरताना दिसत आहेत. या कारवाईत नांदा येथील सामान्य कुटुंबांना लक्ष्य केले जात असून, श्रीमंतांसाठी वेगळा आणि गरिबांसाठी वेगळा न्याय लावला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
अधिकारी की दादागिरी? घागरगुंडे पथकाचा उद्धटपणा.
या मोहिमेचे नेतृत्व ‘पूजा घागरगुंडे’ महिला अधिकारी करत आहे. जेव्हा काही जागरूक नागरिकांनी त्यांना “लाईन कापण्यापूर्वी पूर्वसूचना का दिली नाही?” असा विचारणा केली, तेव्हा “आम्हाला सूचना देण्याची काय गरज?” असे उद्धट उत्तर देण्यात आले. इतकेच नव्हे तर, ओळखपत्राची मागणी केली असता, “आयकार्ड घरी आहे, ऑफिसमध्ये आहे” अशी उडवाउडवीची उत्तरे दिली.
शासकीय गणवेश किंवा ओळखपत्र नसताना अशा प्रकारे जबरदस्तीने वीज कपात करणे हा सर्वसामान्य ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा प्रकार आहे.
नागरिकांमध्ये तीव्र संताप
MSEB च्या या मनमानी कारभारामुळे नांदा फाटा परिसरातील नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत. “आम्ही राबराब राबून बिल भरतो, तरीही चोरासारखी आमची लाईन कापली जाते. मोठ्या थकबाकीदारांना अभय आणि गरिबांवर मात्र गदा, हा कसला न्याय?” असा सवाल स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला आहे.
या अनागोंदी कारभारावर वरिष्ठ अधिकार्यांनी तातडीने लगाम लावावा आणि उद्धट वागणूक देणार्या कर्मचार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
उद्देशपूर्ण करण्या करिता MSEB विभाग मनमानी कारभार करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. एरवी अशा प्रकारचा कोणत्याही कारवाया केल्या जात नाही मात्र उद्देश पूर्ती आली की अशा प्रकारे जोर जबरदस्ती मोहीम राबवून गरिबांचा जीवन अंधारमय करताना दिसून येत आहे.
(फक्त एक महिनाचे बिल बाकी असताना त्यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता लाइन कपात केली. मी नियमित बिल भरत असताना अशा प्रकारे लाइन कपात करणे चुकीचे आहे. सुरेश वासेकर ग्राहक नांदा)
(कर्मचारी यांना ओळखपत्र लावणे अनिवार्य आहे. कदाचित पूर्ण सूचना दिली असावी. रोशन तिरसुडे अभियंता उपविभाग MSEB गडचांदुर)



