जिल्ह्यात १५ जाने. ते ७ फेब्रु.दरम्यान सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान
तपासणी व जनजागृती मोहीम

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : जिल्ह्यात सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी 2026 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार या अभियानासाठी जिल्हास्तरावर व्यापक पूर्वतयारी व नियोजन पूर्ण करण्यात आले आहे. सिकलसेल आजाराचा प्रतिबंध व नियंत्रण राखण्यासाठी या कालावधीत विशेष जनजागृती, तपासणी व समुपदेशन मोहीम राबविण्यात येणार आहे.
40 वर्षापर्यंतच्या वयोगटातील सर्व नागरिकांची सिकलसेल तपासणी रुग्ण व वाहकाची नोंदणी आवश्यकतेनुसार HPLC/इलेक्ट्रोफोरेसीस चाचण्या तसेच रुग्णांना उपचार व समुपदेशन देण्यात येणार आहे. भावी पिढीतील आजाराचे प्रमाण कमी करण्यासाठी विवाहपूर्व व प्रसूती पूर्व समुपदेशन सत्राचे आयोजन ही करण्यात येणार आहे. ही मोहीम अधिक परिणामकारक करण्यासाठी जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र मध्ये आवश्यक मनुष्यबळ व तपासणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जनजागृतीसाठी पोस्टर, पत्रके, सोशल मिडिया, गृहभेटी, आदि माध्यमांचा वापर केला जाणार आहे.
जिल्हा प्रशासनाचे आवाहन : ही मोहीम जिल्हाधिकारी विनय गौडा व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. सर्व नागरिकांनी या विशेष मोहिमेचा लाभ घेऊन सिकलसेल तपासणी करून घ्यावी व सिकलसेल मुक्त चंद्रपूर जिल्हा घडविण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे यांनी केले आहे.



