नायलॉन मांजा / सिंथेटिक मांजा यांच्या वापरावर संपूर्ण बंदी
मा. उच्च न्यायालयाने काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश

चांदा ब्लास्ट
पोंभुर्णा : उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर यांनी Suo Moto PIL No. 1/2021 मधील आदेशान्वये सन २०२१ पासून नायलॉन मांजा / सिंथेटिक मांजा यांच्या वापरावर संपूर्ण बंदी घातलेली आहे. मा. न्यायालयाने दिनांक २४.१२.२०२५ रोजी दिलेल्या आदेशानुसार पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नायलॉन मांजा / सिंथेटिक मांजा तसेच तत्सम इतर कृत्रिम धाग्यांचे उत्पादन, विक्री, साठवणूक, खरेदी व वापर यास कडक मनाई करण्यात आलेली आहे.
नायलॉन मांजामुळे मानवी जीवितहानी, पक्षी व प्राण्यांचे मृत्यू, अपघात तसेच पर्यावरणास गंभीर धोका निर्माण होत असल्याने सदर बंदी आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश मा. उच्च न्यायालयाने दिलेले आहेत.
त्या अनुषंगाने तहसील कार्यालय, पोंभुर्णा यांच्या वतीने संबंधित सर्व नागरिक, व्यापारी, विक्रेते तसेच पतंगप्रेमींना कळविण्यात येते की, नायलॉन मांजा / सिंथेटिक मांजा यांचा वापर करणे, विक्री करणे अथवा साठवणूक करणे हे कायद्याने गुन्हा असून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
तरी सर्व नागरिकांनी मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.



