नवीन वर्षाची सुरुवात व्यसनमुक्त संकल्पाने कुंभारी येथील तरुण मंडळींचा तब्बल २५ वर्षांचा आदर्श उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कुंभारी येथील तरुण मंडळी गेल्या तब्बल २५ वर्षांपासून नवीन वर्षाचा दिवस एका आगळ्या-वेगळ्या आणि प्रेरणादायी संकल्पाने साजरा करत आहेत. सन २००१ पासून अखंडपणे जोपासला जाणारा हा नवसंकल्प म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात कोणत्याही प्रकारच्या व्यसनाने न करता, संत श्री शेगावचे राणा श्री गजानन महाराज यांच्या चरणी मस्तक ठेवून सकारात्मकतेने जीवनाची नवी वाटचाल सुरू करणे.
समाजासाठी आदर्श पिढी घडविण्याचा प्रयत्न
आज जिथे नवीन वर्षाचे स्वागत दारू, सिगारेट, तंबाखू आदी व्यसनांनी केले जाते, त्या प्रवाहाला छेद देत कुंभारीतील तरुणांनी समाजापुढे एक वेगळाच आदर्श उभा केला आहे. दरवर्षी १ जानेवारी रोजी सकाळी सर्व तरुण एकत्र येत गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होतात, भजन-कीर्तन, प्रार्थना करतात आणि व्यसनमुक्त जीवनाचा संकल्प पुन्हा एकदा दृढ करतात.
या उपक्रमामुळे केवळ त्या तरुणांचेच नव्हे तर त्यांच्या कुटुंबांचे आणि संपूर्ण गावाचे वातावरण सकारात्मक बनले आहे. व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देत ही तरुण मंडळी सुसंस्कारित, जबाबदार आणि आरोग्यदायी पिढी घडविण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या २५ वर्षांत अनेक नव्या तरुणांचा या संकल्पात समावेश होत असून ही परंपरा पुढील पिढीकडेही हस्तांतरित होत आहे.
*शासनाकडून सन्मान व प्रोत्साहनाची अपेक्षा*
*आदर्श तरुणाई, सक्षम समाजाची पायाभरणी!”*
सामाजिक दृष्टिकोनातून पाहता, असा उपक्रम हा केवळ धार्मिक नसून तो समाजसुधारणा, व्यसनमुक्ती आणि युवक प्रबोधनाचा प्रभावी मार्ग ठरत आहे. त्यामुळे अशा उपक्रमांचे कौतुक होणे गरजेचे असून शासनानेही अशा आदर्श तरुण मंडळींना प्रोत्साहन, सन्मान व पाठबळ द्यावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
कुंभारी येथील या दिंडीचे नियोजन करण्यासाठी राजू हरकळ, अशोक कदम, संदीप खांडेभराड, जोगेंद्र सपकाळ, बालाजी खांडेभराड, केशव खांडेभराड, राजू खांडेभराड, विलास सपकाळ, बाळू खांडेभराड, कैलास बोबडे, शुभम खांडेभराड, अमोल खांडेभराड.
या तरुण मंडळींचा हा उपक्रम आज संपूर्ण समाजासाठी प्रेरणास्थान ठरत आहे.कुंभारीतील तरुणांनी जपलेला हा नवसंकल्प आजच्या तरुणाईसाठी एक दिशादर्शक ठरत असून, नवीन वर्ष कसे साजरे करावे याचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.



