ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ 

शाळा व महाविद्यालयांत मतदान जनजागृती अभियान

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती निर्माण करणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या उद्देशाने चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये (SVEEP) मतदान जनजागृती अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांनी दिली.

    बुधवार ३१ डिसेंबर रोजी मनपा राणी हिराई सभागृहात विविध शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक बोलविण्यात आली होती. सदर बैठकीस उपायुक्त संदीप चिद्रावार, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक विशाल देशमुख,उपशिक्षणाधिकारी प्राथमिक गणेश येरमे,मनपा प्रशासन अधिकारी सुनील आत्राम, नागेश नित तसेच  ७३ शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मा. राज्य निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार सदर अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

    अभियानाच्या पहिल्या दिवशी दि. ५ जानेवारी २०२६ रोजी सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये “चंद्रपूर शहर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक व माझे कर्तव्य” या विषयावर निबंध स्पर्धा, ६ जानेवारी २०२६ रोजी “मनपा चंद्रपूर सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६” या विषयावर चित्रकला स्पर्धा, तर दि. ७ जानेवारी २०२६ रोजी शाळा व महाविद्यालयांमध्ये चर्चासत्र, पोस्टर स्पर्धा व रांगोळी स्पर्धा शाळास्तरावर आयोजित करण्यात येणार आहेत.

    ८ जानेवारी २०२६ रोजी सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, दि. ९ जानेवारी २०२६ रोजी दुपारी १२.०० वाजता गांधी चौक, चंद्रपूर येथे मनपा स्तरावरील चित्रकला स्पर्धा होणार आहे. शाळा स्तरावरील चित्रकला स्पर्धेतील तीन विजयी स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.

   दि. १० जानेवारी २०२६ रोजी सकाळी ८.०० ते ९.०० या वेळेत सर्व शाळा, महाविद्यालयांमार्फत आपल्या-आपल्या प्रभागात विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे. याच दिवशी सकाळी १०.०० वाजता पालक सभा घेऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.

   अभियानाच्या शेवटच्या टप्प्यात दि. १२ जानेवारी २०२६ रोजी सर्व शाळांमध्ये पत्रलेखन स्पर्धा आयोजित करून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारी पत्रे देतील. तसेच विद्यार्थ्यांना मतदान जनजागृती शपथ देण्यात येणार आहे. या अभियानातून भावी मतदारांच्या माध्यमातुन त्यांच्या परिवारामध्ये मतदान करण्याची जाणीव निर्माण होऊन मोठ्या प्रमाणात मतदानासाठी जनजागृती होईल, असा विश्वास मनपा प्रशासनाने व्यक्त केला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये