आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील महर्षी कर्वे महिला ज्ञान संकुलाला १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर
राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी पत्राद्वारे आ. मुनगंटीवार यांचे केले अभिनंदन

चांदा ब्लास्ट
एसएनडीटी विद्यापीठ प्रकल्पांतर्गत विसापूर (बल्लारपूर) येथे साकारतेय अद्ययावत केंद्र
चंद्रपूर :_ राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून आकाराला येत असलेल्या विसापूर (बल्लारपूर) येथील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलासाठी राज्य सरकारने १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यासंदर्भातील माहिती राज्याचे वित्त व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना दिली आहे. त्याचवेळी त्यांनी आ. मुनगंटीवार यांचे अभिनंदन देखील केले आहे.
बल्लारपूर येथील विसापूरमध्ये ५० एकर जागेत ६२ अभ्यासक्रम असलेले एसएनडीटी विद्यापिठाचे विदर्भातील मोठे केंद्र निर्माण होत आहे. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या केंद्रामध्ये तरुणी व महिलांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. याठिकाणी महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण केंद्र आकाराला येत आहे. या केंद्रामध्ये वाचनालय, प्रेक्षागृह इमारत, शैक्षणिक इमारत आदींचा समावेश आहे. चंद्रपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमधील तरुणी व महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण घेता यावे, यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन महिलांचे आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य जपता यावे तसेच विकासाच्या प्रवाहात महिलांना सामावून घेता यावे, या उद्देशाने मंत्रीपदाच्या काळात आ. मुनगंटीवार यांनी एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने भव्य आणि देखण्या इमारतीच्या निर्माणासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
दरम्यान, दि. १४ डिसेंबर २०२५ रोजी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पत्राद्वारे कळविली आहे. ‘आपण केलेल्या मागणीच्या अनुषंगाने चंद्रपूर जिल्ह्यातील महिला व विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाच्या सुलभ आणि गुणवत्तापूर्ण संधी उपलब्ध होण्याकरीता २०२५-२६ च्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये “मौजे विसापूर येथे एसएनडिटी महिला विद्यापीठ अंतर्गत महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुल उपपरिसर उभारणी करणे” या बाबीसाठी १०० कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याबद्दल आपले अभिनंदन. आपण विधीमंडळ सभागृहात तसेच शासन स्तरावर दीन, दुर्बल, शोषित, पीडीत, अंध, दिव्यांग, निराधार लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच आग्रही असता. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठीची आपली पाठपुरावा करण्याची पध्दत विलक्षण आहे. आपली मागणी पुर्णत्वास आल्याबद्दल आपले पुनःश्च एकदा मनःपूर्वक अभिनंदन,’ असे पत्र राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांना पाठवले आहे.
महिला शिक्षण, आत्मनिर्भरता आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने विसापुर (बल्लारपूर) येथे उभारण्यात येत असलेले ‘महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल’हे केवळ नोकरी शोधणाऱ्या नव्हे, तर नोकरी निर्माण करणाऱ्या सक्षम महिलांना घडवणारे केंद्र आहे.
या ज्ञानसंकुलाच्या माध्यमातून महिलांचे सर्वांगीण सक्षमीकरण घडवून आणले जात असून, एसएनडीटी महिला विद्यापीठ या उपक्रमाला अधिक व्यापक, सशक्त आणि प्रेरणादायी दिशा देईल, असा विश्वास आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.



