दशक लोटली त्या विकासाची पूर्ती कधी होणार
कोरपना तालुका ; जनतेच्या अपेक्षा पानालाच पुसून

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना :_ देशाला स्वातंत्र्य मिळून ७८ तर कोरपना तालुक्याची निर्मिती होऊन ३३ वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटला. परंतु अपेक्षित विकासाच्या कक्षा आजही पाहिजे तशा रुंदावल्या नाही. त्यामुळे अतिदुर्गमपणाचा शिक्का काहीसा पुसला जात असला.
तरी मात्र मागासलेपणाचा शाप अजूनही येथील जनतेच्या नशिबी कायमच दिसून येतो आहे. ११३ गावे असलेल्या या तालुक्यात जामगाव व झोटिंग गाव वगळता प्रत्येक गावाला जाण्या येण्यासाठी पक्का डांबरी रस्ता झाला आहे. हे सकारात्मक चित्र असलं तरी एक दशक उलटून ही चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा, पारडी येथील पैनगंगा नदीवरील पूल तयार होऊन ही रस्त्याचे काम प्रलंबित पडल्याने सुयोग्यरीत्या प्रवास मार्ग म्हणून सज्ज होऊ शकला नाही. हीच स्थिती वनसडी – कवठाळा -पौनी या जिल्हा महामार्गाची आहे. रस्ता तर पूर्ण झाला. परंतु नाल्यावरील पुलाची कामे आजगायत पूर्णता होऊ शकली नाही. परिणामी अल्पावधीतच नवनिर्मित रस्त्याची ही वाट लागत चालली आहे.
कोरपना – वणी राज्य महामार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रूपांतर करून चौपदरीकरणाचे काम ही कागदोपत्री देखील पूर्ण होऊ शकले नाही. यातच यावरून शेतीला जोडणारे पानंद रस्ते तर किती कागदावरच असेल याची कल्पना न केलेलीच बरी. भोयगाव येथील वर्धा नदीवरील पुलाची नवनिर्मिती व उंची वाढवणे आवश्यक असताना. जुन्याच पुलावरून धोकादायक रित्या वाहतूक सुरू आहे. गडचांदूर ते आदिलाबाद हा रेल्वेचा महत्वकांक्षी प्रकल्प एकही रुळ आज गायत टाकण्यात न आल्याने प्रवाशांना वाकुल्या दाखवत आहे. अनेक गावात भव्य दिव्य हजारो लिटर क्षमतेचे जलकुंभ उभारण्यात आले. परंतु नळाला पाणीच नाही अशी परिस्थिती आहे.
त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते आहे. शेती व उद्योगाला मुबलक पाणी मिळावे. सिंचन व पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी. यासाठी उभारण्यात आलेले अमलनाला व पकडीगुड्डम सिंचन प्रकल्प ही अर्धवट पडले असल्याने पुरेशे उद्दिष्ट गाठू शकले नाही. त्यामुळे धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती आहे. याच प्रमाणे पैनगंगा नदीवर निम्न पैनगंगा सिंचन प्रकल्प उभारण्याचे काम ब्रिटिशाच्या काळापासून नियोजनात आहे. मात्र याही प्रकल्पाचे काम रेंगाळत चाललले आहे. यातच पैनगंगा व वर्धा नदीवरील प्रस्तावित बॅरेज बंधारे तयार होऊ शकले नाही.
या कारणाने पाण्याचे नियोजनच विस्कटले आहे. अंतरगाव, नारंडा, देवघाट रिठ येथील पुरातन देवस्थानांना ही तीर्थक्षेत्र दर्जा मिळू शकला नाही.त्यामुळे तेथील विकास रखडला आहे. याच सोबत तालुक्यात असलेल्या गोंड, निजाम, यादव,भोसले, परमार कालीन वारस्याचे संवर्धन ही होत नाही. यावर लोक प्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
या समस्या देखील सुटल्या नाही.
क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंची आशा असलेले तालुका क्रीडा संकुल विविध सोयी सुविधाच्या अभावाने अद्यापही पूर्णता सुसज्ज झाले नाही. तालुका स्थानी राष्ट्रीयकृत बँक,बसस्थानक व बस आगार, विज्ञान व वाणिज्य शाखेच्या पदवी शिक्षणाची सोय, एमआयडीसी, कृषी पूरक उद्योग,ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतरन, आदिवासी मुलामुलींच्या वस्तीगृहाची इमारत,तालुका पातळीवरील विविध कार्यालय स्थापन होणे अपेक्षित असताना. त्यावरही पाऊल पडते पुढे अशी कुठलीच स्थिती नाही.
त्यामुळे तालुका वासियांच्या विकासाच्या आशा राष्ट्रीय महामार्गाच्या नवनिर्मिती व्यतिरिक्त कुठेही पूर्ण झाल्या नाही. असेच चित्र पाहायला मिळते आहे.



