ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकऱ्यांची प्रगती हीच खरी अर्थव्यवस्थेची प्रगती : दिनेश चोखारे

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा : चांदा सेवा सहकारी संस्थेच्या सभासदांना ट्रॅक्टर कर्ज वाटप

चांदा ब्लास्ट

“देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर शेतकऱ्यांना सक्षम करणे आवश्‍यक आहे. शेतकऱ्यांची प्रगती म्हणजेच राष्ट्राची प्रगती,” असे प्रतिपादन चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिनेश चोखारे यांनी केले. आधुनिक शेती, यांत्रिकीकरण आणि वेळेची बचत ही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाची प्रमुख साधने असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शेतकऱ्यांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यासाठी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक विविध कर्ज योजनांच्या माध्यमातून सक्रियपणे काम करीत आहे. या उपक्रमाचा लाभ घेत चांदा सेवा सहकारी संस्थेचे सभासद अजय परशुराम सहारे यांना रु. 5 लाख 14 हजारांचे ट्रॅक्टर कर्ज मंजूर करून औपचारिकरित्या वाटप करण्यात आले.

शेतीतील मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारातील स्पर्धा यामुळे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरणाची गरज भासू लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकेच्या कर्जवाटप उपक्रमामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळत आहे.

या कर्ज वितरणाचा कार्यक्रम दिनेश चोखारे यांच्या शुभहस्ते पार पडला.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आर्थिक मदत ही अत्यंत महत्त्वाची आहे. ट्रॅक्टरसारखी आधुनिक साधने शेतीतील वेळ, मेहनत आणि खर्च कमी करून उत्पादनक्षमता वाढवतात. बँकेमार्फत शेतकऱ्यांना आणखी व्यापक सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरूच राहील.”

कार्यक्रमास विभागीय अधिकारी प्रशांत तोटावार, शाखा अधिकारी मुकेश मत्ते, निरीक्षक रोशन तुरारे, चांदा सेवा संस्थेचे पदाधिकारी प्रमोद मत्ते, लिपिक धनंजय आकनूरवार तसेच संस्थेचे सदस्य आणि परिसरातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

कर्ज प्राप्त झाल्यानंतर शेतकरी अजय सहारे यांनी समाधान व्यक्त करत,

“या मदतीमुळे शेतीला वेग मिळेल, वेळेची बचत होईल आणि शेतीतील कामे वेळेत पूर्ण करण्यास मोठी मदत मिळणार आहे,” अशी भावना व्यक्त केली.

 जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांच्या विकासासाठी अनेक उपयुक्त योजना राबविण्यात येत असून, पुढील काळातही अशाच प्रगत व शेतकरीहिताच्या उपक्रमांना चालना देण्याचा निर्धार या कार्यक्रमात व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये