परिचय मेळावे नातेसंबंधांचा उत्सव – आ. किशोर जोरगेवार
जिल्हा भोई समाज सेवा संघ तर्फे परिचय मेळाव्याचे आयोजन

चांदा ब्लास्ट
समाजाचे एकत्र येणे, परस्परांना जाणून घेणे, संस्कार आणि परंपरेने जोडलेली घरे निर्माण करणे, ही फार मोठी सामाजिक शक्ती आहे. या मंचावर उमलणारी प्रत्येक जोडी, ही फक्त दोन व्यक्तींची नाही तर दोन घरांची, दोन कुटुंबांची आणि दोन संस्कृतींची सुसंवादाने होणारी सांगड असून परिचय मेळावा नातेसंबंधांचा उत्सव असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
जिल्हा भोई समाज सेवा संघ तर्फे चंद्रपूर येथे युवक उपवर – उपवधू परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विदर्भ विकास महामंडळचे सेवानिवृत्त सह संचालक प्रकाश डायरे, विदर्भ भोई समाजाचे सरचिटनिस मनोहराव पचारे, भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोटटूवार, रमेश भुरे, महेंद्र पारिसे, यादवराव मेश्राम, नंदु पडाल, राजेश डहारे, श्रिहरी शेंडे आदिं मान्यवरांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार पूढे म्हणाले कि, मोठ्या इमारती, मोठी शहरे, मोठ्या संधी पण नाती हवे खरी प्रेमाची आणि विश्वासाची हेच आपल्याला शिकवणारे असे हे उपक्रम आहेत. योग्य जोडीदाराची निवड ही सर्वात महत्त्वाची निवड आहे. जीवनाच्या प्रवासात हात हातात घेऊन चालणारा साथीदार योग्य असेल तर संपूर्ण जीवन सुंदर बनते.
हा परिचय मेळावा केवळ नाव, काम, शिक्षण एवढ्यावर थांबत नाही इथे विचारांची देवाणघेवाण होते, जीवनमूल्यांची जुळवाजुळव होते, संस्कारांची सांगड जुळते. आपल्या समाजाला सुशिक्षित, शिस्तबद्ध, नैतिक मूल्यांनी बळकट करण्याची हिम्मत अशा कार्यातून तयार होते.
हा केवळ एक कार्यक्रम नाही, तर भविष्यात निर्माण होणार्या अनंत आनंदी संसारांची पायाभरणी आहे. मनुष्याच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे योग्य जोडीदाराची निवड. संसार हा फक्त दोन व्यक्तींचा मिलाप नाहीय तर दोन कुटुंबांचा, दोन संस्कारांचा आणि दोन परंपरांचा सुंदर संगम आहे. आज या ठिकाणी अनेक तरुण-तरुणी आपले भविष्य शोधत आहेत. या परिचयातून निर्माण होणार्या घरांच्या पायावर प्रेम, विश्वास आणि परस्पर सन्मानाची वीट बसावी, अशी इच्छा व्यक्त करतो असे ते यावेळी म्हणाले. यावेळी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.



