आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
कार्यकारी सहाय्यक पदासाठी नियुक्त्या सुरू

चांदा ब्लास्ट
आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कार्यकारी सहाय्यक पदासाठी नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नियुक्ती आदेश देण्यासंदर्भातील संबंधित पत्रे उमेदवारांना मिळण्यास सुरुवात झाली असून, या घडामोडीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
डिसेंबर 2024 मध्ये कार्यकारी सहाय्यक पदासाठी लेखी परीक्षा झाल्यानंतर 25 फेब्रुवारी 2025 रोजी निकाल जाहीर करण्यात आला होता. 5 ते 9 मे 2025 या कालावधीत पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी झाली. त्यानंतर सात महिन्यांहून अधिक काळ उलटूनही अनेक निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती मिळाली नव्हती.
खुला, एससी आणि एसटी संवर्गातील उमेदवारांना सप्टेंबर महिन्यात नियुक्ती देण्यात आली, मात्र ओबीसी, इ डब्लु. एस, एस.ई.बीसी माजी सैनिक व खेळाडू संवर्गातील उमेदवारांची नियुक्ती प्रलंबित राहिली.
ही बाब गांभीर्याने घेत आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देत तातडीने प्रलंबित नियुक्त्या देण्याची मागणी केली होती. संबंधित विभागाशी सतत संपर्क, पाठपुरावा व चर्चा केल्यानंतर नियुक्ती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले असून आता उमेदवारांना नियुक्ती आदेश देणे सुरू झाले आहे.
आमदार जोरगेवार यांनी सांगितले की, योग्य पात्रतेने निवड झालेल्या कोणत्याही उमेदवारास अन्याय होणार नाही. शासन स्तरावर आवश्यक ती सर्व कार्यवाही करण्यात आली असून नियुक्ती प्रक्रिया वेगाने पुढे सरकत आहे. युवकांचे भविष्य सुरक्षित करणे ही आपली जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.



