हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त नागपूरात भव्य कार्यक्रम
श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या छायाचित्रासह टपाल तिकीट जारी होणार

चांदा ब्लास्ट
‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त राज्यभर विविध प्रबोधनपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ७ डिसेंबर २०२५ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम होणार आहे.
राज्य प्रदर्शनी समितीच्या बैठकीत श्री गुरु तेग बहादुर साहिब यांच्या छायाचित्रासह भारतीय डाक विभागामार्फत स्मृतिचिन्ह म्हणून टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय घेतला. ७ डिसेंबर रोजी नागपूर येथील सुरेशचंद्र सुरी ग्राउंड, जरीपटका पोलिस स्टेशन रोड, नारा येथे सकाळी ९ ते रात्री १० वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरीय प्रदर्शनी समितीची बैठक मुंबईत नुकतीच झाली. यावेळी नियोजनाबाबत चर्चा आणि प्रदर्शनाचे सादरीकरण करण्यात आले.
बैठकीस कोकण भवनचे अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा समिती सदस्य रविंद्र पवार, राज्य पंजाबी साहित्य अकादमीचे कार्याध्यक्ष तथा समितीचे निमंत्रक व कार्याध्यक्ष बल मलकित सिंह, समन्वयक तथा कार्यकारी अधिकारी डॉ. जगदिश साकवान, समितीचे सदस्य लढाराम नागवाणी, डॉ.कुलतारसिंह चीमा, जयराम पवार, श्रीनिवास पुलैया, रवींद्र राठोड, अल्पसंख्यांक विकास व औकाफ विभागाच्या अवर सचिव विशाखा आढाव यांच्यासह राज्यस्तरीय समन्वय समितीचे सदस्य यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सिंधी आणि पंजाबी समाजाच्या इतिहासाचे दर्शन घडविणारे ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शनी आयोजित करण्यात येणार आहे. तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात संतांचा इतिहास, कार्य, राष्ट्रसेवा यासंदर्भात माहिती देणारी प्रदर्शनेही उभारण्यात येतील. शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, मोहयाल, वाल्मिकी आणि सिंधी समाज एकत्र येऊन हा ऐतिहासिक समागम कार्यक्रम करणार आहेत.
संतांचे साहित्य आणि पुस्तकांचे विशेष प्रदर्शनही याप्रसंगी आयोजित करण्यात येणार आहे. या शताब्दी समागमाच्या माध्यमातून श्री गुरु तेग बहादुर साहिब यांचा धर्मरक्षण, सहिष्णुता आणि मानवतेचा संदेश महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.



