बीआरटीसी व नागपूर विद्यापीठात शैक्षणिक व संशोधन सहकार्यासाठी सामंजस्य करार

चांदा ब्लास्ट
बांबू क्षेत्रातील शैक्षणिक उन्नती, संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योजकता वाढीसाठी चिचपल्ली येथील बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र (बीआरटीसी) आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार विद्यापीठाच्या कुलगुरू माधवी खोडे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या करारामुळे बांबू तंत्रज्ञान, बांबू हस्तकला, बांबू फर्निचर डिझाईन, बांबू बांधकाम, वन आधारित वास्तुकला व शाश्वत बांधकाम पद्धती आणि निसर्ग निर्वाचन यांसारख्या विषयांवर संयुक्त कार्यशाळा, सेमिनार, प्रशिक्षण शिबिरे आणि क्षेत्रीय भेटी आयोजित करण्यास दोन्ही संस्था एकत्र काम करतील. यामुळे विद्यार्थी–प्राध्यापक विनिमय कार्यक्रम, तज्ज्ञ व्याख्याने आणि संशोधन क्षमतावृद्धीसाठी तांत्रिक देवाणघेवाण यांनाही गती मिळणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी बीआरटीसीमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
रिअल-टाइम प्रोजेक्ट्स, फील्ड असाइनमेंट्स आणि पर्यावरणपूरक विकास उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना बांबू तंत्रज्ञानातील व्यावहारिक ज्ञान मिळणार आहे. अभ्यासक्रम निर्मिती, शैक्षणिक पाठबळ, प्रमाणन आणि बांबू तंत्रज्ञानावर केंद्रित संशोधन व डॉक्युमेंटेशनलाही विद्यापीठाकडून प्रोत्साहन दिले जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत अशा कौशल्याधारित अल्पमुदतीच्या क्रेडिट अभ्यासक्रमांची अंमलबजावणी बीआरटीसीतर्फे करण्यात येणार असून हे अभ्यासक्रम विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांमध्ये Choice-Based Credit System (CBCS) अंतर्गत उपलब्ध करून देण्याची तयारी आहे. बांबू प्रक्रियाकरण, हस्तकला, तंत्रज्ञान आणि उद्योजकता यामध्ये युवक, कारागीर आणि स्थानिक उद्योजकांना दिशा देणारे उपक्रम राबवणे हेही कराराचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.
यावेळी विद्यापीठाच्या कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे (चवरे), कुलसचिव डॉ. राजू हिवसे, बीआरटीसीचे संचालक मनोज कुमार खैरनार, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. उमेश पलीकुंडवार, आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. राजश्री वैष्णव, आयआयएलचे संचालक डॉ. प्रकाश ईटणकर, आजीवन अध्ययन व विस्तार विभाग संचालक डॉ. समित माहोरे, डॉ. निशिकांत राऊत, रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन, एलईडी महिला महाविद्यालयातील डॉ. सारिका दगडकर, वनपरिक्षेत्र अधिकारी ए. डी. मल्लेलवार तसेच हस्तकला निर्देशक किशोर गायकवाड यांची उपस्थिती होती.
या कराराचा कालावधी पाच वर्षांचा असून हा करार बांबू आधारित शाश्वत उपजीविका, रोजगारनिर्मिती, ग्रामीण विकास आणि हरित उद्योजकतेच्या दिशेने एक मोलाचे पाऊल मानला जात आहे. विशेषतः विदर्भासारख्या बांबू समृद्ध भागास याचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे. बीआरटीसीच्या तांत्रिक अनुभवास विद्यापीठाच्या शैक्षणिक सामर्थ्याची जोड मिळाल्याने महाराष्ट्रातील बांबू क्षेत्रासाठी एक मजबूत, दीर्घकालीन आणि परिणामकारक सहकार्य मॉडेल उभे राहणार आहे. या करारामुळे बीआरटीसी चिचपल्लीचे स्थान राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवरील बांबू उत्कृष्टता केंद्र म्हणून अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी केंद्राचे संचालक मनोज खैरनार यांनी व्यक्त केला.



