एड्स विरोधी शपथ घेऊन दिला समानतेने जगण्याचा सल्ला
जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रम व बाईक रॅली

चांदा ब्लास्ट
१ डिसेंबर जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून जिल्हाभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अनुषंगाने विविध सामाजिक संस्था, महाविद्यालय यांच्या सहकार्याने जनजागृती रॅली काढण्यात आली. या वर्षीचे घोषवाक्य ‘अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही/एड्स ला लढा देऊ, नवं परिवर्तन घडवू !’ असे आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांच्या मार्गदर्शनाखाली व रोटरी क्लबचे अध्यक्ष संदीप रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली १ डिसेंबर जागतिक एड्स दिन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संदीप रामटेके यांनी एडस् विरोधी शपथेचे वाचन केले. कार्यक्रमाला इनर्व्हिल क्लबच्या अर्चना उचके, रोटरी क्लबचे श्रीकांत रेशीमवाले, महेश उचके, राजेश गणियारपवार, हिमानी गोयल, शासकिय नर्सिंग कॉलेजच्या वृषाली नानोटे, विद्या रघुगे, समाजकार्य विद्यालयाचे प्राध्यापक संतोष आडे, प्रा. मनुरे, एआरटीचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी, अजय जैस्वाल, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, जिल्हा पर्यवेक्षक निरंजन मंगरूळकर, नसीमा शेख, देवेंद्र लांजे, रोशन आकुलवार, राज काचोळे, माधुरी डोंगरे, संगिता देवाळकर यांची उपस्थिती होती.
एडस् विरोधी शपथ घेऊन मान्यवरांच्या हस्ते बाईक रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरुवात करण्यात आली. सदर रॅली ही सामान्य रुग्णालयातून जटपुरा गेट मार्गे, बसस्टॉप चौक, जटपुरा गेट, गिरनार ते गांधी चौक वरून वापस जिल्हा सामान्य रुग्णालयात समाप्त करण्यात आली. बाईक रॅली मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी, नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, जिल्ह्यातील नामांकित सामाजिक संस्था त्यामध्ये रोटरी क्लब पदाधिकारी, आय.एम.ए. पदाधिकारी, एनर्व्हील क्लब पदाधिकारी, शासकिय नर्सिंग कॉलेज, प्रभादेवी नर्सिंग कॉलेज, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचे समुपदेशक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एआरटी केंद्राचे सर्व कर्मचारी, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था द्वारा अनुदानित संकल्प बहुउद्देशीय ग्राम विकास संस्था, लिंक वर्कर स्कीम, मायग्रंट प्रकल्प, संबोधन ट्रस्ट कोअर प्रकल्प, नोबल शिक्षण संस्था, मायग्रंट प्रकल्प, ट्रकर्स प्रकल्प, विहान प्रकल्प , वन स्टॉप सेंटर इत्यादी स्वयंसेवी संस्थांचे कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
रॅलीच्या सुरुवातीला कार्यक्रमाचे अध्यक्ष संदीप रामटेके यांनी, रोटरी क्लबच्या माध्यमातून विविध प्रकारचे सामाजिक कार्य सुरू असून या आजाराला देखील देशातून हद्दपार करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबर एचआयव्ही बाधित रुग्णांना आरोग्याबाबत, पोषक आहाराबाबत काय मदत करता येईल, असेही ते म्हणाले. समाजकार्य विद्यालयाचे प्रा. संतोष आडे यांनी एचआयव्ही एड्स संदर्भात समाजकार्य विद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली. एआरटीचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी यांनी एआरटी केंद्र, जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधीत रुग्णांना मिळणाऱ्या सोयी सुविधा तसेच शासनाच्या योजना याविषयी माहिती देऊन एड्स प्रतिबंध करण्यासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.
जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी प्रास्तावित करतांना, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर सूचना देऊन गरोदर माता व सामान्य नागरिकांना एचआयव्ही तपासणी करण्याची सुविधा, साहित्याची उपलब्धता आणखी प्रबळ करण्याचे आश्वासन दिले. त्याचबरोबर डापकू कर्मचारी, आयसीटीसी केंद्र, डीएसआरसी केंद्र व स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, तालुकास्तरावरील व जिल्हा स्तरावरील आयसीटीसी केंद्र कशाप्रकारे कार्यरत असून नागरिकांना मोफत तपासणी, समुपदेशन, उपचार उपलब्ध करून देत आहे, याबद्दल माहिती दिली.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी तर आभार जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर यांनी मानले.



