ताज्या घडामोडी

अखेर वादग्रस्त महिला वाहतूक निरीक्षक निलंबित – शाहिद बिरसा मुंडा अवमान प्रकरण भोवले

आगार व्यवस्थापकासह सहा अधिकारी व कर्मचाऱ्यांना आरोपपत्र - एस टी महामंडळाची धडक कारवाई

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राज्य परिवहन महामंडळाने  शहीद बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम साजरा केला नसल्याने धडक कारवाई करत राजुरा आगारातील महिला वाहतुक निरीक्षक शुभांगी लाडसे ह्यांना निलंबित केले असून आगार व्यवस्थापक, प्रभारी आगार व्यवस्थापक ह्यांचेसह इतर चार कर्मचाऱ्यांवर आरोपपत्र दाखल केले आहे.

सविस्तर वृत्त असे की, 15 नोव्हेंबर रोजी आदिवासी समाजाचे मानबिंदू असलेले शहीद बिरसा मुंडा ह्यांच्या जयंतीदिनी शासकीय आदेशाची अवहेलना करून राष्ट्रीय पुरुषांची जयंती साजरी केली नाही तसेच त्यांचा फोटो अडगळीत धुळ खात पडला असल्याचे लक्षात आल्यानंतर राजुरा आगारातील आदिवासी समाजाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. अखेरीस कर्मचाऱ्यांच्या दबावापुढे नमते घेत वाहतुक निरीक्षक शुभांगी लाडसे व इम्रान शेख ह्यांनी सायंकाळच्या सुमारास शहीद बिरसा मुंडा जयंतीचा कार्यक्रम घेतला.

शासकीय आदेशाची पायमल्ली करणे तसेच शहीद बिरसा मुंडा ह्यांचा झालेला अवमान सहन न झाल्याने विविध आदिवासी संघटनांनी राजुरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली तसेच एस टी महामंडळाच्या विभागीय व्यवस्थापक त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांना तक्रार देऊन संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी केली व मागणी पुर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता.

अखेरीस महामंडळाने विभागीय चौकशी करून राजुरा आगारातील महिला वाहतुक निरीक्षक शुभांगी लाडसे ह्यांना क. राप/विनि/चंद्र/वाह/अप/२३/२०२५/२०७२ दिनांक २९/११/२०२५ नुसार आरोपपत्र व क. राप/विनि/चंद्र/वाह/अप/२३/२०२५/२०७३, दिनांक २९/११/२०२५ नुसार निलंबित करण्याचे आदेश निर्गमित केले तर राकेश सु. बोधे, आगार व्यवस्थापक, रा.प.राजुरा, अशोक दे. गोमासे, सहायक वाहतूक अधिक्षक (आगार व्यवस्थापक, रा.प. राजुरा या पदाचा कार्यभार) यांचे अहवाल प्रादेशिक व्यवस्थापक, स नि. स. क.३, रा.प.नागपूर यांचेकडे पुढील कार्यवाहीसाठी हया कार्यालयाचे पत्र क. राप/विनि/चंद्र/लघुलेखक/५१९, दिनांक २९/११/२०२५ नुसार पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आले.

ह्याशिवाय वाहतुक निरीक्षक शेख इम्रान शेख लतीफ, ह्यांना राप/विनि/चंद्र/वाह/अप/२४/२०२५/२०७४, दिनांक २९/११/२०२५, अ. मा. वासेकर, लेखाकार, यांना क. राप/विनि/चंद्र/वाह/अप/२५/२०२५/२०७५ दिनांक २९/११/२०२५, तसेच मनोज अ. कोल्हापुरे, मुख्य कारागीर यांना क.राप/यंअ/चंद्र/विकाशा/प्रशा/अप/३५०१ दिनांक ०१/१२/२०२५ व प‌द्मा आनंदराव डुकरे, वाहतूक नियंत्रक रा.प. राजुरा आगार यांना क. राप/यंअ/चंद्र/विकाशा/प्रशा/अप/३५०२ दि ०१/१२/२०२५ नुसार आरोपपत्र देण्यात आले असुन सविस्तर चौकशीअंती उचित कारवाईचे आश्वासन अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्लीचे विदर्भ महासचिव ॲड. डॉ. मधुकर कोटनाके ह्यांना पत्राद्वारे देण्यात आले आहे.

ह्यासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना ॲड. डॉ. मधुकर कोटनाके ह्यांनी झालेल्या कारवाईवर असमाधान व्यक्त करताना सांगितले की, केवळ एक अधिकाऱ्यावर कारवाई करून इतरांना पाठीशी घालणे अयोग्य असुन त्या दिवशी कर्तव्यावर असलेल्या सर्वच अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार  प्रतिबंधक कायद्यान्वये तसेच ज्यांच्यावर हा कायदा लागु होत नाही अशांवर समकक्ष कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात यावा अन्यथा आदिवासी समाज तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये