विकासाच्या मुद्यावरच ब्रम्हपुरीत काँग्रेसची सत्ता येणार – विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार
ब्रम्हपुरी भव्य रोड शो व जाहीर सभा

चांदा ब्लास्ट
लोकप्रतिनिधी म्हणून सूत्रे हाती घेताच शहराचा विकास केला. कालची ब्रम्हपुरी व आजची ब्रम्हपुरी यातील तुलनात्मक बदल आपल्याला जाणवतो आहे. या शिक्षणाच्या पंढरीला पुनश्च प्रगतीच्या वाटेवर नेण्यासाठी आपण पुन्हा एकदा काँग्रेस उमेदवारांना भरभरून आशीर्वाद द्या. असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी ब्रम्हपुरी येथे काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेतून केले.
आयोजित सभेस प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्रार्थना बेहेरे,प्रा. देविदास जगनाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदीप गड्डमवार, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, डॉ. राजेश कांबळे, प्रमोद चिमूरकर, डॉ.थाणेश्वर कायरकर, इकबाल जेसानी, सोनू नाकतोडे, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार योगेश मिसार व सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार, काँग्रेस पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना विजय वडेट्टीवार म्हणाले की, भाजप सत्ताकाळात ब्रम्हपुरी शहराच्या विकासाला पूर्णतः खीळ बसली होती. आज दिल्ली ते गल्ली पर्यंत सत्ता आली असताना भाजपने केवळ नागरिकांना काँग्रेस काळात कार्यान्वीत केलेल्या योजनां व्यतिरिक्त काहीच दिले नाही. या उलट महागाई बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड दरवाढ केली. गेल्या ६ महिन्यांपासून श्रावण बाळ, वृद्धापकाळ, निराधार योजनेचे पैसे दिले नाही. जाचक अटी लादून फसवी लाडकी बहीण योजना हे महायुती सरकार गुंडाळण्याचा तयारीत आहेत. आम्ही शहराच्या विकासासह येथील महिलांना काम देण्यासाठी रेडिमेड गारमेंट उद्योगाच्या माध्यमातून शहरातील २हजार महिलांना रोजगार देणार आहोत.येथील विद्यार्थी मी कार्यान्वीत केलेल्या इ- लायब्ररीतून प्रशासकीय सेवेत मोठे अधिकारी होणार आहेत. येणाऱ्या काळात शहराचा सर्वांगीण विकास करून पूर्ण चेहरामोहरा बदलविण्याचे मोठे व्हिजन हे आमच्या माझ्याकडे व आमच्या काँग्रेस उमेदवारांकडे आहे. आपण पुन्हा एकदा आम्हाला मतदार रुपी आशीर्वाद देऊन आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
तर ब्रम्हपुरी विधानसभेचे नेतृत्व करणारे विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी शिक्षणाची पंढरी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुरी शहरातील अंतर्गत रस्ते, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय, पथदिवे,गडार लाईनची कामे, रेल्वे लाईन वरील उडान पूल, प्रशस्त शासकीय इमारती, वातानुकूलित ई – लायब्ररी, सामाजिक व सांस्कृतिक सभागृह, क्रीडा संकुल या सर्व बाबींचा शहरात कसोशीने केलेल्या विकास कामांचा आढावा प्रा. देविदास जगनाडे यांनी उपस्थितांपुढे मांडला.
आयोजित सभेस काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते तथा हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



