बल्लारपूरचा विकासाचा वेग थांबणार नाही! – आमदार सुधीर मुनगंटीवार यांची ग्वाही
आ. सुधीर मुनगंटीवार यांचे विकासकामांना प्राधान्य देण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर नगरपरिषद प्रचारसभेत विकासनिश्चयाचा पुन्हा उच्चार
चंद्रपूर : बल्लारपूर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मागील काळात अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली असून, शहरात आधुनिक सुविधा, उत्तम पायाभूत व्यवस्था आणि दर्जेदार नागरी सेवा उपलब्ध होत आहेत.हा विकासप्रवास आणखी गतिमान करत, बल्लारपूरचे भविष्य अधिक सक्षम, समृद्ध आणि लोकाभिमुख करण्याची ग्वाही राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
बल्लारपूर येथील नगरपरिषद उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना ते बोलत होते.आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, केंद्र आणि राज्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार असून, बल्लारपूर विधानसभेचा प्रतिनिधी म्हणून मी स्वतः कार्यरत आहे. त्यामुळे बल्लारपूर नगरपरिषदेवर भाजपचा नगराध्यक्ष निवडून आल्यास विकासाची गती आणखी वाढेल. नागरिकांनी खोट्या आश्वासनांना आणि भावनिक भूलथापांना बळी न पडता विकासाच्या आधारावर मतदान करावे. आपल्या जीवनमानात खरा बदल घडविण्यासाठी भाजपचे बटन दाबून मतदान करा असे आवाहन यावेळी केले.
बल्लारपूरात आतापर्यंत 600 निवासी पट्टे वितरित करण्यात आले असून, पुढेही अतिक्रमणधारकांना निवासी पट्टे देण्याची विक्रमी मोहीम राबविण्यात येणार आहे. कुडा-मातीच्या घरात राहणाऱ्या गरिबांना घरकुल योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. मुलींच्या मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून देण्यात येत असून, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच दिव्यांगांना इलेक्ट्रिक ट्रायसिकल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्यांचे नियमित निराकरण केले जात असून, पुढील काळातही ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.तसेच निराधार नागरिकांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, असे आमदार श्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
बल्लारपुर शहरात विक्रमी विकास कामांची अंमलबजावणी:
अत्याधुनिक सैनिक शाळा, स्टेडियम, तहसील कार्यालय, एसडीओ कार्यालय, स्टेडियम, बॉटनिकल गार्डन, एसएनडीटी महिला विद्यापीठाचे उपकेंद्र, बस स्थानक, नाट्यगृह, स्मार्ट आयटीआय, पोलीस स्टेशन, स्व. सुषमा स्वराज यांच्या नावाने महिला सक्षमीकरण केंद्र, ईएसआयसी ओपीडी केंद्र, कॉलरी मैदान येथे स्टेडियम, सास्ती पुलाचे बांधकाम, स्व. विपिन रावत यांच्या नावाने जिम, पट्टे वाटप, सिमेंट रस्ते, पाणीपुरवठा योजना, सोलर ट्यूबवेल, 33 केव्हीचे विद्युत केंद्र, ऑटोरिक्षा स्टँड, व्हाॅलीबॉल कोर्ट, वस्तीगृह, छटपूजा घाट, गणपती घाट, डिजिटल शाळा, महात्मा गांधी व्यापार संकुलाचे आधुनिकीकरण, रेल्वेमार्फत लाईफ लाईन एक्सप्रेसच्या माध्यमातून रुग्णसेवा, आरोग्य शिबीर, नेत्रचिकित्सा शिबिर, वाचनालय, जलतरण तलाव,उत्तम आरोग्य सुविधेसाठी ग्रामीण रुग्णालयात सिटीस्कॅन, एमआरआय मशीन बसवण्यात येत आहे. नगरपरिषदेची नवीन इमारत तसेच 37 कोटी रुपये खर्च करून न्यायालयाची प्रशस्त इमारत उभी राहत आहे. आगामी काळातही बल्लारपूरचे भवितव्य अधिक उज्ज्वल व समृद्ध होईल.
प्रभागनिहाय प्रचारसभेत उमेदवारांना मजबूत पाठबळ:
यावेळी पंडित दीनदयाल वार्ड बल्लारपूर येथील प्रभाग क्रमांक 1 चे नगरसेवक पदाचे उमेदवार रेखाताई तोडसाम, लखनसिंह चंदेल, प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार मोहित डंगोरे, शुभांगी जाधव, प्रभाग क्रमांक 5 चे उमेदवार ओमप्रकाश प्रसाद, दीपमाला यादव, मौलाना आझाद वार्ड, बल्लारपूर येथील प्रभाग क्रमांक 7 चे उमेदवार अजय दुबे, पुष्पाताई देवईकर, प्रभाग क्रमांक 8 चे उमेदवार अब्दुल आबिद गफार शेख,चोवंता केशकर,शिवाजी वार्ड बल्लारपूर येथील प्रभाग क्रमांक 12 चे उमेदवार नीरज झाडे, सुवर्णाताई भटारकर, प्रभाग क्रमांक 13 चे उमेदवार शालूताई कुमरे, किरण चंदेल तसेच सुभाष वार्ड, बल्लारपूर येथील प्रभाग क्रमांक 16 चे उमेदवार येलय्या दासारफ, वर्षाताई सुचूंवार, प्रभाग क्रमांक 17 चे उमेदवार विश्वजीतसिंह चंदेल आणि विद्याताई खरतड यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते.
खोट्या आश्वासनाला, जातीपातीच्या राजकारणाला बळी पडू नका
बल्लारपूर शहरातील विकासकामे न पाहता जातीच्या आधारावर मतदान केले तर त्या शहराचे भविष्य कोणीही सुधारू शकणार नाही. त्यामुळे खोट्या आश्वासनाला व जातीपातीच्या राजकारणाला बळी न पडता विकासाला मतदान करा, असे आवाहन देखील आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.



