ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संविधानिक मूल्यांचे पालन करून घुग्घुसचा सर्वसमावेशक विकास करू – आ. जोरगेवार

भारतीय जनता पार्टीच्या वतीने घुग्घुस येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

चांदा

घुग्घुस येथील भारतीय जनता पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला आमदार किशोर जोरगेवार यांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. भारतीय संविधानाची महानता, सामाजिक समानतेची संकल्पना आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी प्रयत्न करत अधिकारासह कर्तव्याचेही पालन करणे गरजेचे आहे. आज संविधानिक अधिकारांमुळे एक सर्वसाधारण कुटुंबातून आलेला व्यक्ती तुमच्यापुढे आमदार म्हणून उभा आहे. याच संविधानिक मूल्यांचे पालन करून घुग्घुसचा सर्वसमावेशक विकास करू, असे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले.

या कार्यक्रमाला महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, घुग्घुस शहराध्यक्ष संजय तिवारी, महामंत्री नामदेव डाहुले, तालुका अध्यक्ष विनोद खेवले, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा दुर्गम, बहुजन आघाडी प्रमुख विमल कातकर, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, सायली येरणे, कौसर खान, उषा आगदारी, आशा देशमुख, विनिता निहाल, नीलिमा वनकर आदींची उपस्थिती होती.

दरवर्षीप्रमाणे यंदाही घुग्घुस येथील कार्यालयात भारतीय जनता पार्टीच्या वतीने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बोलताना आ. जोरगेवार म्हणाले की, भारताचे संविधान हे जगातील सर्वात प्रगतशील आणि समतावादी संविधान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना संविधानाच्या केंद्रस्थानी ठेवून खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचा पाया घातला. आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा या मूल्यांचा विचार करणे आणि त्यांची अंमलबजावणी आपल्या कृतीतून करण्याची गरज आहे.

ते पुढे म्हणाले की, घुग्घुस परिसरात विकास, शिक्षण, रोजगार आणि मूलभूत सुविधांच्या उभारणीसाठी आम्ही सातत्याने काम करत आहोत. संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग करून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचवणे हेच आपल्या लोकशाहीचे खरे बळ असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमास स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये