घुग्घुस नगर परिषद निवडणूक 2025 : प्रभाग क्र. 03 मध्ये ‘बदल’ विरुद्ध ‘जुनी नेते’
जनता काय निवडणार?

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (जि. चंद्रपूर) — प्रभाग क्रमांक 03 ची राजकीय समीकरणे यंदाच्या नगर परिषद निवडणुकीत पूर्णपणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत. कारण, दशकेभर प्रभागावर वर्चस्व राखणाऱ्या तीन दिग्गज नेत्यांना यंदा थेट आव्हान देण्यासाठी एक 38 वर्षीय तरुण, तडफदार सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार म्हणून ओळख असलेले प्रणयकुमार शंकर बंडी (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरदचंद्र पवार गट) निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
दुसरीकडे मैदानात उतरणाऱ्या दिग्गजांची यादीही कमी वजनदार नाही —
राजीरेड्डी प्रोद्दाटूरी (घुग्घुस शहराध्यक्ष, काँग्रेस), साजन गोहने (भाजपा कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य), महेश लट्टा (माजी भाजपा कार्यकर्ते, माजी ग्रामपंचायत सदस्य व वर्तमान उमेदवार – उद्धव बाळासाहेब ठाकरे गट). या तिघांचे राजकारण वाद, पक्षांतर, मतदारांपासून दुरावा आणि न संपणाऱ्या घोंगड्यांतच अडकून राहिले, असा आरोप नागरिकांकडून वेळोवेळी होत आला आहे.
प्रभाग 03 मध्ये खदखदणारे प्रश्न — पण उत्तरं कुठे?
प्रभागातील मूलभूत समस्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्ष झाल्याचे कटू वास्तव नागरिकांनी वेळोवेळी व्यक्त केले आहे. WCL ने उभारलेली RO वॉटर मशीन आजतागायत सुरू का नाही? यामागे कोणती ‘सांठगांठ’ आहे, हा नागरिकांचा सरळ प्रश्न आहे. मोठ्या उद्योगपती आणि ट्रान्सपोर्टर्सच्या वाहनांवर कारवाई करण्यात स्थानिक नेतृत्व असमर्थ का? बायपास रोड — 2009 पासून कासवगतीने! नावापुरता विकास, कामापेक्षा अधिक भ्रष्टाचार आणि दर्जाहीन कामांची प्रकरणे जनतेला चांगलीच ठाऊक आहेत. RR चौकातील पाइपलाइन फुटणे आणि वारंवारच्या दुरुस्त्या — विकासापेक्षा “कमाईचा उद्योग” अशी चर्चा. 2012 पासून रोड लाईटचा पत्ता नाही, पण कॅलेंडरवर मात्र रोड लाईट कायम “कार्यरत”! चुनाव आलं की लगेच कामं सुरू — हीच तर घुग्घुसची परंपरा? लॉईड्स मेटल आणि ACC अडाणी कंपनीत प्रभाग 03 मधील स्थानिक कर्मचारी — पण त्यांचे हक्क, सुविधा, सुरक्षिततेबाबत कोणी बोलले? खाजगी शाळांमधील शिक्षकांची प्रायव्हेट ट्युशन–अकादमीद्वारे सुरू असलेली आर्थिक लूट — शिक्षण अधिकाऱ्यांचे आणि काही नेत्यांचे मौन संशय वाढवते.
“काही प्रश्न तर कोणाच्याच गळ्यात अडकलेले आहेत!”
जनता विचारते आहे, नेते बदलले, पक्ष बदलले… पण प्रभागाचा चेहरा का बदलला नाही? निवडणूक आली की आश्वासने — आणि पुढील पाच वर्षे अंधार? आंदोलनं फक्त कॅमेऱ्यासाठी की प्रश्न सोडवण्यासाठी?
प्रणयकुमार शंकर बंडी — बदलाचे चेहरे की फक्त नवीन प्रयोग
साप्ताहिक–दैनिक पत्रकारिता, सामाजिक चळवळी व प्रभागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणे — या मागे असलेला संघर्ष हा त्यांचा मुख्य आधार. त्यांच्या उमेदवारीने प्रभाग 03 मध्ये बदलाची लहर येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
जनता बदल देईल की जुने चेहरेच पुन्हा निवडेल?
प्रभाग 03 मधील जनता आता दोन मार्गांच्या फाट्यावर उभी आहे — दशकांपासून अपयशी ठरलेल्या नेतृत्वाला पुन्हा संधी द्यायची? की नवीन चेहऱ्यावर विश्वास ठेवून बदलाचा मार्ग स्वीकारायचा? हे सर्व 02 डिसेंबर 2025 रोजी मतपेटीतून स्पष्ट होईल. आणि 03 डिसेंबरला निकाल सांगेल की जनता जागी झाली की अजूनही “नेतेच बरोबर” याच भ्रमात आहे.



