प्रभाग क्र. 9 मध्ये नाल्याचे दुरुस्ती काम ठप्प — नागरिकांनी दिले लेखी निवेदन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस (जि. चंद्रपूर) — प्रभाग क्र. 9 मधील नाल्याचे दुरुस्ती व अडथळे दूर करण्याचे काम मागील काही दिवसांपासून ठप्प असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या समस्येबाबत आज (19 नोव्हेंबर 2025) प्रभागातील रहिवासी पृथ्वीराज चंद्रय्या आगधारी यांनी नगरपरिषद मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देत तातडीने दुरुस्तीची मागणी केली.
निवेदनात नमूद केल्यानुसार, प्रभाग क्र. 9 मधील चौरसपक्की रस्ता जवळील नाला तुटलेला असून, पावसाळ्यात व मालवाहतूक वाहनांच्या हालचालीमुळे नाल्याची दुरवस्था झाली आहे. विशेषतः पादचारी आणि शालेय विद्यार्थी, यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नाल्याची तातडीने दुरुस्ती न केल्यास अपघाताची शक्यता वाढू शकते. तसेच साचलेल्या पाण्यामुळे डासांची वाढ होऊन आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
निवेदनात नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रहिवाशांनी चेतावणी दिली आहे की समस्या लवकर न सोडवल्यास ते मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा मार्ग अवलंबतील.



