बँक ऑफ इंडियाचा दुःखाच्या काळात सहकार्याचा हात
अपघातातील मृतकाच्या वारसदारांना अपघाती विमा रकमेचा धनादेश सुपूर्द

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
ग्राहकांना सौहार्दपूर्ण व आपुलकीची वागणूक देणारी बँक म्हणून बँक ऑफ इंडिया सर्वांना परिचित आहे. केवळ जीवित असतांनाच नव्हे तर ग्राहकाच्या मृत्यूनंतरही ग्राहकाच्या वारसांना पॉलिसीच्या माध्यमातून आर्थिक मदत या बँकेद्वारे प्रदान केली जाते. सुमारे २ महिन्यांपूर्वी अपघातात मृत्यू पावलेल्या ग्राहकांच्या वारसदारांना आज बँक ऑफ इंडिया, देऊळगावराजा शाखेच्या वतीने १५ लाख ६१ हजार रुपयांचा अपघाती विमा रकमेचा धनादेश सुपूर्द करुन सामाजिक उत्तरदायित्व जोपासले. याप्रसंगी स्टार युनियन दाई-इची इन्शुरन्स कंपनीचे टेरिटरी मॅनेजर निखिल लोहकरे, बँक ऑफ इंडिया, देऊळगावराजा शाखेचे शाखाधिकारी प्रदीप पवार, डॉ.अशोक काबरा, पत्रकार गणेश डोके यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्थानिक त्र्यंबकनगर भागातील दीपक आसाराम सरोदे यांचा १२ ऑगस्ट २०२५ रोजी जालना रोडवरील डॉ.शिंदे हॉस्पिटलसमोर अपघाती मृत्यू झाला होता. या अगोदर दीपक सरोदे यांनी बँक ऑफ इंडिया बँकेच्या माध्यमातून स्टार युनियन दाई-इची इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी काढलेली होती. दीपक सरोदे यांनी या पॉलिसीचे दोन हप्ते वेळेवर भरले होते. मात्र काही कारणास्तव ते पुढील हप्ते भरु शकले नाही. दरम्यान १२ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला.
त्यानंतर दीपक सरोदे यांच्या वारसांना अपघाती विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी बँकेच्या वतीने इन्शुरन्स कंपनीकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. आज या विमा रकमेचा धनादेश बँक अधिकारी व इन्शुरन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या हस्ते मृतक दीपक सरोदे यांची आई पुष्पा आसाराम सरोदे, पत्नी माया दीपक सरोदे व अमोल पांडुरंग मुख्यदल यांना देण्यात आला.
यावेळी बँक ऑफ इंडियाचे अविनाश लहाने, कल्याणी भगत, राहुल साळवे, नितीन जाधव, कैलास वायाळ, शिवराज ठाकरे, वनिता भगत, सचिन भाग्यवंत, संदीप साबळे यांच्यासह ग्राहक उपस्थित होते.
या पॉलिसीचा हप्ता जास्त रकमेचा नसल्यामुळे सर्वसामान्य खातेधारकांनाही ही पॉलिसी काढणे सहज शक्य होते. दुर्दैवाने जर पॉलिसीधारकाचा नैसर्गिक किंवा अपघाती मृत्यू झाला तर पॉलिसीची रक्कम व त्याचे लाभ पॉलिसीधारकाच्या वारसांना मिळू शकतात.
या धावपळीच्या जीवनात अपघात विमा व पॉलिसी काढून घेणे ही काळाची गरज असल्यामुळे बँकेच्या जास्तीत जास्त खातेधारकांनी अपघात विमा पॉलिसी काढून घ्यावी असे आवाहन देऊळगावराजा येथील बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी प्रदीप पवार यांनी केले आहे.



