भद्रावती नगरपरिषद निवडणूक धुमाळीत प्रा. संजय आसेकर यांचा भाजपात प्रवेश
“रविंद्र शिंदे यांची राजकीय खेळी” — माजी नगरसेवक प्रा. संजय आसेकर

चांदा ब्लास्ट
“सन 2009 व 2014 मध्ये मी सुनील नामोजवार यांचा सलग दोनदा पराभव केला”
भद्रावती :_ आगामी भद्रावती नगरपरिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे आयोजित मार्गदर्शन शिबिरात आज महत्त्वपूर्ण राजकीय घटना घडली. माजी नगरसेवक प्रा. संजय आसेकर यांनी अधिकृतरित्या भाजपात प्रवेश करून स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगवली आहे.
भद्रावतीतील माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांना सन 2009 व 2014 च्या निवडणुकीत सलग दोनदा पराभूत करून आपली छाप उमटवणारे नेतृत्व म्हणजेच प्रा. आसेकर. त्यामुळे त्यांचा भाजपात प्रवेश हा निवडणूकपूर्व काळात महत्त्वाचा राजकीय टप्पा मानला जात आहे.
प्रवेशप्रसंगी प्रा. आसेकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. तसेच वरोरा-भद्रावती विधानसभा आमदार मा. करणजी देवतळे, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आणि भद्रावती नगरपरिषद निवडणूक प्रभारी मा. रविंद्र शिंदे, तसेच वरोरा विधानसभा संघटक किशोरजी बावणे,माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पक्षप्रवेश केला.
पक्षप्रवेशानंतर प्रा. आसेकर म्हणाले—
“रविंद्र शिंदे हा माझा विद्यार्थी असला तरी माझा राजकीय गुरू म्हणजे रविंद्र शिंदेच आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 2009 व 2014 मध्ये माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांना सलग दोनदा पराभूत केले.”
त्यांच्या या वक्तव्याला उपस्थित कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
आमदार करणजी देवतळे यांनी प्रा. आसेकर यांच्या प्रवेशाचे स्वागत करत सांगितले की,
“प्रा. आसेकर यांच्या अनुभवामुळे भाजपाच्या संघटनात्मक बळात लक्षणीय वाढ होईल व आगामी निवडणुकीत पक्षाला निश्चितच मोठा फायदा होणार आहे.”
भद्रावतीच्या राजकारणात प्रा. आसेकर यांचा प्रवेश हा भाजपासाठी महत्त्वाचा ठरणार असून स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम स्पष्टपणे दिसेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजयभाऊ वासेकर, माजी नगरसेवक प्रशांतजी डाखरे, प्रवीण सातपुते, किशोर गोवर्धने, युवा मोर्चा नेते विशाल ठेगणे तसेच भारतीय जनता पक्षाच्या सर्व विंगचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



