कोळसा वाहतुकीच्या धुळीने शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान
कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमि. कडे शेतकऱ्यांची लाखोंची नुकसान भरपाई थकित

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती तालुक्यातील कर्नाटका पावर कॉर्पोरेशन लिमिटेड या कोळसा खाणीतून निघणाऱ्या कोळशाची वाहतूक कोंढा फाटा मार्गावरून माजरी रेल्वे साईडिंग पर्यंत मोठमोठ्या हायवा ट्रकच्या माध्यमातून रात्रंदिवस सुरू असते. त्यामुळे या मार्गावर दोन्ही बाजूंनी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीतील उत्पादनावर परिणाम होत असून शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार कंपनीकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान होवूनही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास कंपनी टाळाटाळ करत आहे. मागील पाच वर्षांपासून परिसरातील ६५ शेतकऱ्यांची थकीत असलेली ही रक्कम लाखोंच्या घरात गेली आहे. त्यामुळे नुकसान भरपाई मिळविण्याकरिता शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
भद्रावती तालुक्यातील गट ग्रामपंचायत कढोली-किलोनी, कुरूडा, बोनथाळा येथील माजी सरपंच गणेश जिवतोडे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतांवर कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमी. च्या कोळसा वाहतुकीमुळे गेल्या पाच वर्षांपासून गंभीर परिणाम होत असून, लाखोंचे पीकनुकसान झाले आहे. सन २०२० मध्ये कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल) ची बरांज येथील कोळसा खाण पुन्हा सुरू झाल्यानंतर कोळसा वाहतूक दिवस-रात्र सुरू आहे. या धुळीमुळे पिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता सातत्याने घसरत आहे. त्यामुळे गणेश जिवतोडे व इतर शेतकरी सन २०२०-२१ पासून सतत तहसीलदार, जिल्हाधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी करत आहेत.
दरवर्षी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून शेतातील पिकांची पाहणी करून नुकसानभरपाईचा अहवाल तयार केला जातो. हे अहवाल जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याकडेही पाठवले गेले असून, त्यांनी कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशन लिमी. बरांज ला शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, कंपनीकडून आजपर्यंत कोणतीही भरपाई देण्यात आलेली नाही. माजी सरपंच तसेच शेतकरी गणेश जिवतोडे व प्रभावित शेतकऱ्यांनी अनेकदा कंपनीकडे मागणी करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगितले आहे. प्रत्यक्षात या भागातील अंदाजे ६५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले असूनसुद्धा, आवाज उठवणारे मोजके शेतकरीच प्रकरणाचा सतत पाठपुरावा करत आहेत.
“कर्नाटका पॉवर कॉर्पोरेशनच्या कोळसा वाहतुकीच्या धुळीमुळे आमची पिके नष्ट होत आहेत, पण कंपनी आमच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे. तालुका कृषी अधिकारी दरवर्षी नुकसानीचा अहवाल देतात, पण प्रत्यक्षात आम्हाला एक रुपयाही भरपाई मिळालेली नाही. आम्ही २०२० पासून प्रशासनाकडे धाव घेत आहोत, पण आता सहनशक्ती संपली आहे. राजकिय नेत्यांनीही आमच्याकडे पाठ फिरवली आहे. आमचे नुकसान लाखोंमध्ये गेले आहे, तरीही आमची कुणालाच काळजी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आम्हाला तीव्र आंदोलन करण्याशिवाय पर्याय उरला नाही. “
गणेश जिवतोडे
– प्रभावित शेतकरी तसेच माजी सरपंच गट ग्रामपंचायत कढोली-किलोनी, कुरूडा, बोनथाळा



