धानाला योग्य भाव द्यावा : नाजुका आलाम
बल्लारपूर महिला काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्ष यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे ठोस मागणी

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर तालुक्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडू नयेत आणि त्यांच्या कष्टिकामाला न्याय मिळावा, यासाठी धानाला तातडीने योग्य भाव घोषित करण्यात यावा, अशी ठाम भूमिका बल्लारपूर महिला काँग्रेस कमिटीच्या तालुका उपाध्यक्ष नाजुका हनुमान आलाम यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी निवेदनाद्वारे मांडली. सध्या बाजारातील घसरते भाव, वाढलेला खर्च आणि तांदुळ मिलर्सकडून सुरू असलेली मनमानी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अवस्था अधिकच बिकट होत असून शासनाने तातडीचे पाऊल उचलण्याची त्यांनी मागणी केली.
आलाम म्हणाल्या की, शेतकरी वर्षभराचा कष्टाचा पीक घेऊन बाजारात येत असताना त्यांना ठोस दर मिळत नाही. खत, बियाणे, कीडनाशके, मजुरी यासह सर्वच इनपुट खर्चात मोठी वाढ झालेली आहे; मात्र धानाचा खरेदीदार ठरवलेला हमीभाव अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने तातडीने किमान आधारभूत किंमतीत वाढ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे त्या म्हणाल्या.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात धान खरेदीमध्ये पारदर्शकता आणावी, बनावट बिलिंग रोखण्यासाठी कडक उपाययोजना कराव्या, तसेच खरेदी केंद्रांवरील त्रासदायक प्रक्रियांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांसाठी सुलभ प्रणाली उभी करावी, अशीही मागणी केली.
तसेच धान खरेदी सुरू असताना व्यापाऱ्यांकडून होणारी अवाजवी घसघशीत कपात तातडीने थांबवून प्रशासनाने विशेष पथक नेमून तपासणी करावी, असेही त्या म्हणाल्या.
आलाम यांच्या या भूमिकेला महिला काँग्रेस कार्यकर्त्यांसह अनेक शेतकरी संघटनांनीही पाठिंबा दर्शवला आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये या मागणीमुळे आशेची भावना निर्माण झाली असून आगामी काही दिवसांत शासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.



