‘राजशिष्टाचार आणि निधी वाटपात भेदभाव नको
खा. धानोरकर यांचा थेट मनपा आयुक्तांना इशारा; प्रोटोकॉल भंगावरून तीव्र संताप

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : चंद्रपूर शहर महानगरपालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला आणि जनप्रतिनिधींचा राजशिष्टाचार पाळण्यात होत असलेल्या दुर्लक्षाला खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज थेट महानगरपालिका गाठून जाब विचारला. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी आपल्या समर्थकांसह महानगरपालिका आयुक्तांच्या दालनात धडक देत त्यांना घेराव घातला आणि प्रोटोकॉल भंगासह निधी वाटपातील भेदभावावर जाब विचारला.
“प्रशासनाने तात्काळ राजशिष्टाचार पाळावा, लोकप्रतिनिधींना सन्मान द्यावा आणि निधी वाटप करताना कोणताही भेदभाव करू नये, अन्यथा याचे गंभीर परिणाम प्रशासकीय अधिकाऱ्यांनी भोगण्यास तयार राहावे,” असा थेट इशारा खासदार प्रतिभा धानोरकर यांनी यावेळी आयुक्तांना दिला.
गेल्या काही दिवसांपासून मनपा प्रशासनातील अधिकारी लोकप्रतिनिधींशी योग्य समन्वय साधत नाहीत. शासकीय भूमिपूजन सोहळ्यात लोकप्रतिनिधींना डावलले जात होते. तसेच, शहराच्या काही भागांमध्ये निधी वाटप करताना हेतुपुरस्सर भेदभाव केला जात असून, आवश्यक कामे बाजूला ठेवली जात असल्याचा गंभीर आरोपही खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केला.
या गंभीर प्रकाराने संतप्त झालेल्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज चंद्रपूर शहर महानगर पालिका गाठले आणि आयुक्तांच्या दालनात पोहोचताच प्रशासनाच्या या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला.
राजशिष्टचाराचा भंग करणे म्हणजे लोकशाही व्यवस्थेचा आणि जनतेच्या मताचा अपमान आहे. प्रशासकीय अधिकारी जाणूनबुजून लोकप्रतिनिधींना डावलत आहेत आणि त्यामुळे शहराच्या विकासाची कामे, रस्ते आणि पाणीपुरवठ्यासारख्या तातडीच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे, असे त्या म्हणाल्या.
यावेळी महानगर पालिका आयुक्त विद्या गायकवाड, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपयुक्त चिदलवार,शहर काँग्रेस अध्यक्ष संतोष लहामगे, शहर काँग्रेस माजी अध्यक्ष रामू तिवारी, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल रजा, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, युवक काँग्रेस अध्यक्ष राजेश अडूर, इंटक युवा नेते प्रशांत भारती, भालचंद्र दानव, माजी नगरसेवक पिंटू शिरवार, काँग्रेस युवा नेते राहुल चौधरी, नौशाद शेख, गुंजन येरमे, सौरभ ठोंभरे यांची उपस्थिती होती.
अखेरीस, प्रोटोकॉलचे कठोरपणे पालन केले जाईल आणि निधी वाटप करताना कोणताही भेदभाव केला जाणार नाही, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्यानंतरच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी घेराव मागे घेतला.



