ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैद्यकीय अधिक्षकाअभावी रुग्ण सेवा प्रभावीत

सावली ग्रामीण रुग्णालयातील प्रकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

सावली येथील ग्रामिण रुग्णालयात मागील तीन ते चार वर्षापासून कायमस्वरुपी वैद्यकीय अधिक्षकासह वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील रुग्ण सेवा प्रभावीत झालेली आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांवर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आलेली आहे.

सावली तालुक्याचे मुख्यालय असुन यात 111 गावांचा समावेश आहे. रुग्णसेवा सुरळीत रहावी म्हणून शासनाने लाखो रुपये खर्च करुन सावली मुख्यालयी ग्रामिण रुग्णालयाची निर्मिती केली. परंतु मागील तीन ते चार वर्षापासून या रुग्णालयात प्रशिक्षणार्थी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केल्या जात असून मागील एक वर्षापासून सहा ते सात वैद्यकीय अधिकारी बदलल्याचे चित्र आहे. तर वैद्यकीय अधिक्षक नसल्याने प्रशिक्षणार्थी वैदयकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरु आहे. सध्या कार्यरत वैदयकीय अधिकारी आपल्या मनमर्जीने कामकाज करीत असून साध्याही आजाराच्या रुग्णांना जिल्हयाच्या ठिकाणी रेफर केल्या जात आहे. रेफर केलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंडाचा सामना करावा लागत आहे. तर मोबाईलवरुन उपचार करण्याची नविन पधदत सुरु असल्याची चर्चा रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये आहे.

सावलीचे ग्रामिण रुग्णालयात परिसरातील रुग्ण उपचारासाठी येतात. परंतु या रुग्णालयात कायमस्वरुपी वैद्यकीय अधिक्षक नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. त्यामुळे त्यांना खाजगी रुग्णालयाचा सहारा घ्यावा लागत आहे. मात्र अशा गंभीर बाबीकडे वरिष्ठांचे दुर्लक्ष होत असुन रुग्णसेवा सुरळीत करण्यासाठी तात्काळ कायमस्वरुपी वैद्यकीय अधिक्षकासह वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरत आहे.

     सध्या कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांची मनमानी सुरु असुन रुग्णासह रुग्णांच्या नातेवाईकासोबत वागणूक चांगली नाही. परिणामी रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे तात्काळ अशा वैदयकीय अधिकाऱ्याला हटविण्यात यावे.

                           प्रीतम गेडाम, नगरसेवक

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये