शहरातील अडीच कोटी रुपयांच्या विकासकामांचे आ. जोरगेवार यांच्या हस्ते भूमिपूजन
शास्त्रिनगर, बंगाली कॅम्प, इन्डस्ट्रियल प्रभाग तसेच एमईएल प्रभागातील १२ कामांचा समावेश

चांदा ब्लास्ट
शहरातील मूलभूत सुविधांच्या उभारणीला गती देत शास्त्रिनगर, बंगाली कॅम्प, इन्डस्ट्रियल परिसर आणि एमईएल प्रभागातील विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आले. अंदाजे अडीच कोटी रुपयांच्या निधीतून रस्ते विकास, सौंदर्यीकरण, सुरक्षा भिंत उभारणी, नाली बांधकाम यांसह नागरिकांना थेट उपयुक्त ठरणाऱ्या अनेक कामांचा यात समावेश आहे.
यावेळी कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, भाजप नेते प्रकाश देवतळे, तुषार सोम, बलराम डोडाणी, महामंत्री मनोज पाल, रविंद्र गुरुनुले, श्याम कनकम, सविता दंढारे, मंडळ अध्यक्ष रवि जोगी, प्रदीप किरमे, स्वप्निल डुकरे, सुभाष अदमाने, वनिता डुकरे, शितल गुरुनुले, विलास सोमलकर, जितेश कुळमेथे, विश्वजीत शहा, राम हरणे, शेखर शेट्टी, नुतन मेश्राम यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
भूमिपूजनानंतर उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, विकासकामांबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. विकास हा केवळ कागदावर नव्हे, तर जमिनीवर दिसला पाहिजे. चंद्रपूर शहरातील प्रत्येक प्रभागात आजही काही मूलभूत सुविधा अपुऱ्या आहेत. पाणी, रस्ते, जलनिस्सारण, सुरक्षितता आणि परिसराचा एकूण विकास या सर्व गोष्टींना प्राधान्य देत आम्ही काम करीत आहोत.’
ते पुढे म्हणाले, नागरिकांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. भूमिपूजन झालेली कामे पूर्ण झाल्यावर या भागांचा चेहरामोहरा बदलेल, सुविधा वाढतील आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ होईल, असे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



