आ.सुधीर मुनगंटीवार धावून आले कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कापूस खरेदीची सीसीआय मर्यादा मागील वर्षीप्रमाणेच कायम ठेवण्याची आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
आ.मुनगंटीवार यांची चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे आग्रही मागणी

चांदा ब्लास्ट
आ. मुनगंटीवार यांनी सीसीआयच्या संचालकांसोबतही केली चर्चा; मिळाला सकारात्मक प्रतिसाद
चंद्रपूर – राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान वाचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सीसीआयने (कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया) जाहीर केलेली कापूस खरेदीची मर्यादा चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नुकसानदायक असून ही मर्यादा मागच्या वर्षीप्रमाणे कायम ठेवावी, अशी आग्रही मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी सीसीआयच्या संचालकांसोबतही दूरध्वनीवर चर्चा केली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात आ. श्री. मुनगंटीवार म्हणतात, ‘महाराष्ट्र कृषी विभागाने चालु हंगाम सन 2025-26 मध्ये कापसाची उत्पादकता ही प्रती हेक्टरी 12.80 क्विंटल ग्राह्य धरून पणन मंत्रालयामार्फत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयाला पाठवली आहे. त्यानुसार सीसीआयने चालु हंगामातील प्रती हेक्टरी 13.57 क्विंटल ग्राह्य धरून कापुस खरेदीची मर्यादा जाहीर केली. परंतु, प्रत्यक्षात चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हा प्रती हेक्टरी सरासरी 25 ते 40 क्विंटल कापसाचे उत्पन्न घेत असल्यामुळे शेतकऱ्यांपुढे सीसीआयमार्फत कापूस विक्री करीता मोठी अडचण निर्माण झाली आहे.’
सन 2024-25 या वर्षात या दोन्ही जिल्ह्यांसाठी सीसीआयने प्रती हेक्टरी 30 क्विंटल ही मर्यादा जाहीर केली होती. त्याप्रमाणे शेतकरी बांधवांनी कापूस विक्रीची प्रक्रिया देखील पूर्ण केली होती. चालू हंगामातील प्रती हेक्टरी क्विंटल मर्यादा फारच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चालू वर्षात देखील प्रती हेक्टरी 30 ते 40 क्विंटल ग्राह्य धरून कापूस खरेदीची मर्यादा जाहीर करावी, अशी विनंती त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सन 2025-26 या चालू हंगामात ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना उर्वरीत कापूस एमएसपी पेक्षा कमी दरात व्यापाऱ्यांना विकण्याची वेळ येणार नाही. याकरीता सीसीआयमार्फत कापूस खरेदीची मर्यादा मागील वर्षीची कायम ठेवून चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही यादृष्टीने प्रशासनाला आदेश द्यावे, असे आ. श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
त्याचवेळी सीसीआयचे संचालक श्री. ललितकुमार गुप्ता यांच्याशीदेखील आ. श्री. मुनगंटीवार यांनी दूरध्वनीवरून चर्चा केली. शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान त्यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर श्री. गुप्ता यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांच्या कल्यासाठी सदैव तत्पर असलेले आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा एका महत्त्वाच्या विषयावर पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात मारेगांव जि. यवतमाळ येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक श्री. रमन शाम डोये यांच्याकडून आ. श्री. मुनगंटीवार यांना निवेदन प्राप्त झाले होते.
शेतकऱ्यांसाठी सदैव तत्पर
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी 202 कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यात आला होता. अलीकडेच 20 हजार हेक्टर प्रमाणे प्रत्येकी दोन हेक्टर धानाच्या बोनससंदर्भातील त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले. आणि 227 कोटी रुपयांचा बोनस जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या धान चुकाऱ्याचे 27 कोटी 52 लाख रुपये सातत्यपूर्ण पाठपुरावा करत मंजूर करून घेतले.शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लढण्याची तयारी हेच त्यांच्या कार्यशैलीचे खरे वैशिष्ट्य आहे.



